
कोंढवेधावडे येथे लोकशाही दिनाचे आयोजन; तब्बल 491 नागरिकांनी एकाच ठिकाणी घेतला विविध सेवांचा लाभ; हवेली प्रांत अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन तर तहसीलदार पूर्णवेळ होते लक्ष ठेवून
कोंढवेधावडे येथे लोकशाही दिनाचे आयोजन; तब्बल 491 नागरिकांनी एकाच ठिकाणी घेतला विविध सेवांचा लाभ; हवेली प्रांत अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन तर तहसीलदार पूर्णवेळ होते लक्ष ठेवून
पुणे
237 सातबारा वाटप,88 उत्पन्न दाखले, 35 आदिवासी कातकरी नागरिकांना वयाचे प्रमाणपत्र,28 वारस ठराव निर्गती,19 वारस नोंद अर्ज,35 आदिवासी कातकरी नागरिकांचे जात प्रमाणपत्र नोंदणी,24 शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी,35 लहान मुले,नागरिकांची आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती अशी कामे या लोकशाही दिनाच्या निमित्ताने करण्यात आली. रिंग रोड मोबदला,पानंद रस्ते, वारस नोंद, वादविवाद तसेच महसूल कर्मचाऱ्यांच्या तक्रारी यांबाबत प्रांत अधिकारी डॉ यशवंत माने यांनी स्पष्ट शब्दांत मार्गदर्शन केले व त्याच वेळी टाळाटाळ न करता लोकांसाठी काम करण्याचा सल्ला त्यांनी उपस्थित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.
सदर कार्यक्रमासाठी शुक्राचार्य वांजळे, अनिता इंगळे, त्र्यंबक मोकाशी, सचिन पासलकर, सचिन मोरे, सचिन पायगुडे, संतोष शेलार, दत्ता बोढके, महसूल, आरोग्य, कृषी, ग्रामविकास, आदिवासी विकास आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोंढवे धावडे मंडळ अधिकारी भारत रुपनवर यांनी या उपक्रमाच्या आयोजन व नियोजनाची संपूर्ण जबाबदारी पार पाडली. लोकशाही दिनासाठी आलेल्या सर्व नागरिकांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
आदिवासी कातकरी नागरिकांसाठी उपक्रम ठरला उपयुक्त
कोपरे व आगळंबे गावच्या हद्दीत राहणाऱ्या आदिवासी कातकरी नागरिकांसाठी हा लोकशाही दिन अत्यंत उपयुक्त ठरला. अठरा वर्षांवरील नागरिकांचे आधारकार्ड काढण्यासाठी विशेष व्यवस्था याठिकाणी करण्यात आली होती. तसेच संयुक्त पंचनामे करून आरोग्य अधिकारी व आदिवासी विभागातील निरीक्षक यांच्या मदतीने वयाचे पुरावे तयार करण्यात आले. आदिवासी कातकरी नागरिकांच्या पुढील समस्या सोडविण्यासाठी या लोकशाही दिनाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावी काम झाल्याचे दिसून आले.

‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या पाठपुराव्याचे कौतुक
आदिवासी कातकरी नागरिकांच्या समस्यांबाबत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ जितेंद्र डुडी, हवेली प्रांत अधिकारी डॉ यशवंत माने यांची याबाबत भेटही घेण्यात आली होती. लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात प्रांत अधिकारी डॉ यशवंत माने, तहसीलदार किरण सुरवसे, आदिवासी विभागाच्या रेणुका जाधव यांनी आवर्जून उल्लेख करत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस करत असलेल्या कामाचे कौतुक केले.

तहसीलदार शेवटपर्यंत होते लक्ष ठेवून
दरम्यान लोकशाही दिनाच्या कार्यक्रमासाठी आलेले हवेली तहसीलदार किरण सुरवसे हे पूर्णवेळ लक्ष ठेवून होते. नागरिकांना किंवा उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना अडचण आल्यास मार्गदर्शन करत होते. आलेल्या सर्व नागरिकांची कामे झाल्याशिवाय कोणीही जायचं नाही अशी सूचना त्यांनी सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली होती. त्यांना प्रोत्साहन म्हणून तहसीलदार स्वतःही पूर्णवेळ थांबून होते.
