
Child Dead Body: नांदेड फाट्याजवळ कालव्यात आढळला अज्ञात लहान मुलाचा मृतदेह; नांदेड सिटी पोलीसांकडून तपास सुरू
Child Dead Body: नांदेड फाट्याजवळ कालव्यात आढळला अज्ञात लहान मुलाचा मृतदेह; नांदेड सिटी पोलीसांकडून तपास सुरू
सिंहगड रोड: नांदेड फाट्याजवळील कालव्यात अंदाजे तीन ते चार वर्षे वयाच्या अज्ञात मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अद्याप या मृत मुलाची ओळख पटली नसून नांदेड सिटी पोलीस याबाबत तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली आहे.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खडकवासला कालव्यात नांदेड फाट्याजवळील पुलापासून काही अंतरावर लहान मुलाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती नांदेड सिटी पोलीसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस व इतर अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील अंदाजे तीन ते चार वर्षे वयाच्या मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
वर्दळीचा रस्ता असल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाली होती. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली आहे. दरम्यान हा घातपात आहे की अपघात याबातची माहिती पोलिसांच्या अधिक तपासानंतर समोर येणार आहे.