खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला गुन्हेगाराला सोबत घेऊन जाणे भोवले? युवासेना पदाधिकाऱ्याची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी
पुणे: खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला हेमंत दाभेकर या गुन्हेगाराला सोबत घेऊन जाणे युवा सेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर यांना भोवले असून त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार पदावरून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे युवासेना सचिव किरण साळी यांनी पत्रात नमूद केले आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करतानाचा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या हेमंत दाभेकर व इतरांचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. याबाबत खासदार संजय राऊत यांनीही कडाडून टिका केली होती.
चहूबाजूंनी टिकेची झोड उठल्यानंतर तातडीने संबंधित गुन्हेगाराला घेऊन जाणारे युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे याच कारणास्तव ही हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.