बातमी केली म्हणून खडकवासला येथील अवैध धंदेवाल्याची धमकी; महिला आयोग अध्यक्षांकडून कारवाईची मागणी
पुणे: हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांची बातमी केली म्हणून खडकवासला येथील एका गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अवैध धंदेवाल्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत संबंधित अवैध धंदेवाल्याविरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही ट्विटरद्वारे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘अवैध धंद्यांची हवेली’ या मथळ्याखाली हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांबाबत ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने काल दि 23 जानेवारी 2024 रोजी बातमी प्रसिद्ध केलेली आहे. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काल सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खडकवासला येथील अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला अवैध धंदेवाला रामदास सोनवणे सीडब्ल्युपीआरएस समोरील हॉटेल मध्ये आला व बातमी का केली म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. ‘माझं कोणीही काहीही वाकडं करु शकत नाही’ हे त्याचं वाक्य म्हणजे पोलीस घेत असलेल्या हप्त्यांमुळे त्याच्यात आलेला निर्ढावलेपणा दाखवत होतं.
त्याच्या बोलण्यावरुन व हालचालींवरुन तो काहीतरी ठरवून आल्याचे दिसत होते. याबाबत तातडीने जाऊन हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक व कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडेही कारवाईबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची व अवैध धंदे बंद करण्याची मागणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडे केली आहे.
‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ ठाम
अवैध धंदेवाले व पोलीस अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने परस्पर पुरक भुमिका त्यांच्याकडून घेतल्या जात असल्याचे दिवसा ढवळ्या गर्दीच्या ठिकाणी घडविण्यात आलेल्या या घटनेवरून दिसून येत आहे. अशा धमक्या आल्या, हल्ले झाले तरी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे असलेले विषय निर्भीडपणे मांडण्यात येणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासनाने आपल्या भूमिकेबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे.