
IMPACT NEWS: राष्ट्रीय जल अकादमीसमोर अपघात टाळण्यासाठी तात्पुरते दुभाजक बसविले; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्परतेने कार्यवाही
IMPACT NEWS: राष्ट्रीय जल अकादमीसमोर अपघात टाळण्यासाठी तात्पुरते दुभाजक बसविले; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्परतेने कार्यवाही
सिंहगड रोड: सिंहगड रस्त्यावरील राष्ट्रीय जल अकादमी (NWA) समोर काम सुरू असलेल्या अंडरपासच्या बाजूने अपघात रोखण्यासाठी तात्पुरते दुभाजक बसवून सुरक्षा पट्टी बांधण्यात आली आहे. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परतेने कार्यवाही करत आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.
पुलाचे काम सुरू असल्याने सदर ठिकाणी सध्या एकाच बाजूने पूर्ण वाहतूक सुरू आहे. वाहतूक नियोजनासाठी व संभाव्य अपघात रोखण्यासाठी सुरुवातीला या ठिकाणी प्लास्टिकचे तात्पुरते दुभाजक बसविण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी सर्व खांब तुटल्याने वाहनचालकांना अंदाज येत नव्हता.
दुभाजक नसल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याबाबत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने सार्वजनिक बांधकाम विभागाचे व पुणे शहर वाहतूक पोलीसांचे लक्ष वेधून घेतले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांनी तातडीने दुभाजक बसवून घेतले जातील असे सांगितले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.
“किरकटवाडी फाटा ते नांदेड फाटा पुलापर्यंत वाहनांचा वेग जास्त असतो. या टप्प्यात यापूर्वी अनेक अपघात झालेले आहेत. सध्या काम सुरू असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे. काम पूर्ण होईपर्यंत प्रशासनाने काळजी घ्यावी. तात्पुरते दुभाजक तुटल्यास लगेच दुरुस्ती करण्यात यावी.” सौरभ मते, माजी सरपंच खडकवासला.