
श्रीराम नवमी निमित्ताने धायरी येथे भव्य शोभायात्रा; पारंपरिक वेशभूषेत महिला-चिमुकल्यांचा लक्षणीय सहभाग; हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध कार्यक्रम
श्रीराम नवमी निमित्ताने धायरी येथे भव्य शोभायात्रा; पारंपरिक वेशभूषेत महिला-चिमुकल्यांचा लक्षणीय सहभाग; हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध कार्यक्रम
धायरी: धायरी येथे श्रीराम नवमी निमित्त भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सिंहगड रस्ता परिसरातील हजारो श्रीराम भक्तांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. पतितपावन संघटना व सरकार प्रतिष्ठानच्या माध्यमातून अखिल नरवीर तानाजी मालुसरे पथ श्रीराम नवमी उत्सव समीतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पारंपरिक वेशभूषेत महिला-मुलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे दिसून आले.
धायरी येथील गणेशनगर ते धायरी फाट्यापर्यंत भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. यात अघोरी शिवपार्वती विवाह सोहळा, नादब्रह्म ढोलताशा पथक, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, वारकरी पथक, बॅंड पथक, डीजे व जगन्नाथपुरी रथ यांनी लक्ष वेधून घेतले. परिसरातील नागरिक हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. महत्वाचे म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा संपूर्ण सोहळा पार पडला.
शोभायात्रे दरम्यान विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व मान्यवरांनी सहभागी होत आयोजकांचे कौतुक केले.यामध्ये नितीन सोनटक्के, दिलीप वेडेपाटील, दिपक नागपुरे, सचिन दोडके, मयुरेश वांजळे, निलेश गिरमे, श्रीकांत शिळीमकर, बाप्पूसाहेब पोकळे, महेश पोकळे, दिपक चव्हाण आदिंचा सहभाग होता. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पतितपावन संघटना व सरकार प्रतिष्ठानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.