
अवघ्या काही महिन्यांत एनडीए-बहुली रस्ता खचला; रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह; कारवाई करण्याची मागणी
कुडजे
कमळजाई मंदिर ते कुडजे गावादरम्यान असलेल्या तीव्र वळणाच्या परिसरात तीन ते चार ठिकाणी रस्ता खचला आहे. डोंगर उतार व खाली मुरुम असतानाही रस्ता खचल्याने काम निकृष्ट करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन याबाबत कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
तसेच अनेक ठिकाणी पुलांचे कामही अर्धवट असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अर्धवट कामामुळे अपघाताचाही धोका आहे. रस्त्याच्या कडेने पाणी जाण्यासाठी चर खोदले नसल्याने जागोजागी पावसाचे पाणी नव्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रस्ता लवकर खराब होण्याची शक्यता आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता नामदेव राठोड यांच्याशी संपर्क साधला असता,” संबंधित ठेकेदाराला कडक सूचना देण्यात आल्या असून आवश्यक ठिकाणी तातडीने दुरुस्ती करून घेण्यास सांगितले आहे,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.