
Sinhagad Ghat road Accident: सिंहगड घाट रस्त्यावर कारचा ब्रेक फेल झाल्याने अपघात; चौघेजण जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही
पुणे:
सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास देशमुख परिवार सिंहगडावरुन आपल्या टाटा नॅनो कारने खाली येत होता. वन विभागाच्या तपासणी नाक्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या चिंचेच्या वळणाजवळ देशमुख यांच्या कारचा ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटलेली कार झाडावर आदळल्याने गाडीतील दोन लहान मुली व दोन पुरुषांना गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने कार झाडावर आदळून थांबल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सर्व जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिंहगड घाट रस्त्यावर मागील काही दिवसांपासून सातत्याने अपघात होत आहेत. असे असताना वन विभाग किंवा इतर संबंधित प्रशासनाने उपाययोजना केलेल्या नाहीत. वन विभाग उपद्रव शुल्काच्या नावाखाली पर्यटकांकडून दररोज लाखो रुपये वसूल करत आहे मात्र त्या पैशांचा पर्यटकांची सुरक्षितता किंवा गडाच्या विकासासाठी उपयोग होताना दिसत नाही. अपघात झाल्यानंतर जखमींना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका तैणात असणे आवश्यक आहे मात्र त्याबाबत प्रशासन उदासीन आहे. घाट रस्त्यावर नेटवर्क नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता येत नाही. घाट रस्त्यावर ऑकीटॉकी सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांची गस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. एखादी मोठी दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार का?