
शस्त्राचा धाक दाखवून धायरी येथील सोन्याच्या दुकानावर भरदिवसा दरोडा;35 ते 40 तोळे सोने लुटल्याची माहिती; पोलीस घटनास्थळी दाखल
शस्त्राचा धाक दाखवून धायरी येथील सोन्याच्या दुकानावर भरदिवसा दरोडा;35 ते 40 तोळे सोने लुटल्याची माहिती; पोलीस घटनास्थळी दाखल
धायरी: धायरी येथील रायकरमळा परिसरातील श्री ज्वेलर्स नावाच्या सोन्याच्या दुकानावर भरदिवसा तीन अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून तब्बल 35 ते 40 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या दरोड्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नांदेड सिटी पोलीस व पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एक दरोडेखोर अंगठी घ्यायचा बहाना करुन दुकानात आला. त्यानंतर इतर दोघांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील कामगार व मालकाला शस्त्राचा धाक दाखवून दागिने हिसकावण्यास सुरुवात केली. काही वेळातच तब्बल 35 ते 40 तोळे सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी हिसकावले व पसार झाले.
याबाबत माहिती मिळताच नांदेड सिटी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. झोन तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. पुणे शहर पोलीसांची विविध पथके सध्या घटनास्थळी दाखल झाले असून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.