
Crime update: त्या मृतदेहाचे गूढ उकलले; अवघ्या काही तासांत नांदेड सिटी पोलीसांकडून घटनेचा उलगडा
Crime update: त्या मृतदेहाचे गूढ उकलले; अवघ्या काही तासांत नांदेड सिटी पोलीसांकडून घटनेचा उलगडा
किरकटवाडी
सकाळी सिंहगड रस्त्याला लागून स्वागत हॉटेल च्या समोर नाल्यामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती नांदेड सिटी पोलीस स्टेशनला मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस,इतर अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या शरिरावर जखमा दिसत असल्याने घातपाताची शक्यता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली.
सीसीटीव्हीची तपासणी करत असताना तपास पथकाला डंपर चालकाची संशयास्पद हालचाल दिसून आली. त्यानुसार MH 12 WJ 9552 या डंपरचा चालक संदीप सुर्यभान धनवटे ( वय 33, रा. किरकटवाडी) याला बोलवून घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने घटनेची कबुली दिली आहे. मृत देवानंद मारतुगी हा दारुच्या नशेत डंपरखाली झोपला असावा, डंपर सुरु केल्यानंतर चाकाखाली काहीतरी आल्याचे जाणवले तेव्हा खाली उतरून पाहिले तेव्हा हे दिसून आल्याचे चालकाने कबूल केले. नांदेड सिटी पोलीसांनी चालक संदीप धनवटे याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जखमीला नाल्यात का फेकले?
दरम्यान मृत देवानंद मारतुगी हा डंपरच्या चाकाखाली चिरडल्याची कबुली चालकाने दिली आहे. जर तो चाकाखाली चिरडल्याची माहिती होती तर त्याने तातडीने पोलीसांना किंवा डंपर मालकाला का कळविले नाही? जखमीला वेळीच वैद्यकीय मदत का केली नाही? डंपर घेऊन का निघून गेला? जखमीला नाल्यात फेकून का दिले? घटना लपविण्याचा प्रयत्न का केला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत नांदेड सिटी पोलीस अधिक तपास करत असून लवकरच याबाबत खुलासा होण्याची शक्यता आहे.