
खडकवासला येथील आदिवासी कातकरी नागरिकांचे आधारकार्ड काढण्यासाठी हवेली तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी-तलाठ्यांचा पुढाकार; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या पाठपुराव्याची दखल!
खडकवासला येथील आदिवासी कातकरी नागरिकांचे आधारकार्ड काढण्यासाठी हवेली तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी-तलाठ्यांचा पुढाकार; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या पाठपुराव्याची दखल!
पुणे
खडकवासला येथील आदिवासी कातकरी वस्तीवरील दत्ता बबन जाधव या आदिवासी कातकरी नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर आधार कार्ड नसल्यामुळे काल अंत्यसंस्कार करण्यास विलंब झाला. खडकवासला येथील डॉक्टर आधार कार्ड नसल्याने मृत्यूचा दाखला द्यायला तयार नव्हते व दाखला नसल्याने अंत्यविधीचे सामान मिळत नव्हते. ही बाब द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांच्या निदर्शनास आणून दिली. काल उद्भवलेल्या दुर्दैवी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार किरण सुरवसे यांनी तातडीने सर्व नागरिकांना आधार कार्ड देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना खडकवासला मंडळ अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
त्यानुसार आज खडकवासला तलाठी रवी फणसे व मंडळ अधिकारी हिंदूराव पोळ यांनी ज्यांची आधार कार्ड नोंदणी राहिलेली आहे त्यांना एकत्रित वारजे येथील आधार केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था केली. आधार नोंदणी पूर्ण झाल्यानंतर इतर कागदपत्रे देण्यासाठी लवकरच विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळ अधिकारी हिंदूराव पोळ यांनी दिली आहे.