
Crime News:नांदेड सिटी परिसरात चोरांचा धुमाकूळ;दोन तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पन्नास हजारांची रोकड लंपास; वृद्ध महिलेला मारहाण करत कानातले हिसकावल्याने दोन्ही कानांना दुखापत
Crime News:नांदेड सिटी परिसरात चोरांचा धुमाकूळ;दोन तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पन्नास हजारांची रोकड लंपास; वृद्ध महिलेला मारहाण करत कानातले हिसकावल्याने दोन्ही कानांना दुखापत
नांदेड सिटी: सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथील शुभ कल्याण सोसायटीच्या मागच्या बाजूला असलेल्या शेत वस्तीवर काल रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास चोरांनी धुमाकूळ घालत दोन तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. संतापजनक बाब म्हणजे चोरी करताना चोरांनी वृद्ध महिलेला मारहाण करत कानातले हिसकावल्याने दोन्ही कानांना दुखापत झाली आहे.
शुभकल्याण सोसायटीच्या मागच्या बाजूला निलकंठ देडगे व पांडुरंग देडगे यांचे शेत व शेतावर वस्ती आहे. काल रात्री वृद्ध नर्मदा तुकाराम देडगे (वय 90) व त्यांचा मुलगा पांडुरंग देडगे(वय 65) हे घरी असताना साडेबारा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात चोरांनी घरात प्रवेश केला. चोरांनी पांडुरंग देडगे व वृद्ध नर्मदा देडगे यांना मारहाण केली. घरातील सामान अस्ताव्यस्त फेकत दोन तोळे सोन्याचे दागिने व रोख पन्नास हजार रुपये चोरांनी चोरले. जाताना चोरांनी निर्दयीपणे वृद्ध नर्मदा देडगे यांच्या दोन्ही कानातील कानातले हिसकावल्याने त्यांच्या कानांना दुखापत झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, इतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरांचा शोध घेतला जात आहे.