
अनेक वर्षे धूळखात पडलेल्या खडकवासला चौपाटीवरील पोलीस मदत केंद्राची नांदेड सिटी पोलीसांकडून डागडुजी;पुणे ग्रामीण पोलिसांना पडला होता विसर
अनेक वर्षे धूळखात पडलेल्या खडकवासला चौपाटीवरील पोलीस मदत केंद्राची नांदेड सिटी पोलीसांकडून डागडुजी;पुणे ग्रामीण पोलिसांना पडला होता विसर
खडकवासला: अनेक वर्षे धुळखात पडलेल्या खडकवासला धरण चौपाटीवरील पोलीस मदत केंद्राची पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत नांदेड सिटी पोलीसांनी डागडुजी करून घेतली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षे हे पोलीस मदत केंद्र वापराविना पडून असल्याने त्याची दुरावस्था झाली होती.
खडकवासला धरण चौपाटीवर शनिवार, रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची वर्दळ असते. अनेक वेळा वाहतूक कोंडी होते किंवा हुल्लडबाजी करणाऱ्या उपद्रवी पर्यटकांमुळे वादावादीचे प्रसंग घडतात. अशावेळी तातडीने पोलीस घटनास्थळी पोचावेत यासाठी चौपाटीवर पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले होते. मात्र मागील अनेक वर्षांपासून ते धुळखात पडून होते. हवेली पोलीसांना एवढे काम आणि धावपळ होती की एकही दिवस त्यांना या मदत केंद्रात बसायला वेळ मिळाला नाही! परिणामी या मदत केंद्राची मोडतोड झाली होती.
काही दिवसांपूर्वी हा भाग शहर आयुक्तालयाच्या हद्दीत आल्याने नांदेड सिटी पोलीसांनी हद्दीत गस्त वाढविली आहे. त्यादरम्यान त्यांना हे मोडकळीस आलेले पोलीस मदत केंद्र दिसून आले. संबंधित पोलीसांनी या मोडकळीस आलेल्या मदत केंद्राची डागडुजी करुन, खाली कॉंक्रीटीकरण करुन घेतले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना त्यात बसता येईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. लवकरच हे पोलीस मदत केंद्र सुरु करण्यासाठी नांदेड सिटी पोलीसांचे प्रयत्न सुरू आहेत.
…..आणि ग्रामीण पोलीसांना आली जाग!
नांदेड सिटी पोलीसांनी या मोडकळीस आलेल्या मदत केंद्राची डागडुजी केल्यानंतर अचानक ग्रामीण पोलीसांना जाग आली व एक पोलीस कर्मचारी हे मदत केंद्र आमचं आहे असं म्हणत तेथे गेला होता अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. संबंधित कर्मचारी अथवा त्यांच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना हे मदत केंद्र आजपर्यंत का दिसले नाही? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.