
पालिकेच्या खोदकामामुळे सिंहगड रस्त्यावरील व्यावसायिक हैराण; अत्यंत संथ कामाचा व्यवसायावर परिणाम; तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी
पालिकेच्या खोदकामामुळे सिंहगड रस्त्यावरील व्यावसायिक हैराण; अत्यंत संथ कामाचा व्यवसायावर परिणाम; तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी
सिंहगड रोड: सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेट समोर मुख्य रस्त्याच्या कडेने पालिकेने खोदकाम केलेले आहे. या खोदकामामुळे परिसरातील व्यावसायिक अक्षरशः हैराण झाले असून कामाची गती अत्यंत संथ असल्याने संताप व्यक्त करत आहेत. आमदार भिमराव तापकीर, खासदार सुप्रिया सुळे यांनी याकडे लक्ष देऊन पालिकेला सूचना करण्याची मागणी व्यावसायिक करत आहेत.
नांदेड सिटी मेन गेटच्या पुढच्या बाजूला मागील अनेक दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. सध्या केवळ मोठी नाळ खोदून ठेवण्यात आली असून त्या खोदकामाचा वेग अत्यंत संथ आहे. खोदकामाला इतके दिवस लावण्यात येत असतील तर पुढील कामाला किती दिवस लागतील? असा प्रश्न व्यावसायिक उपस्थित करत आहेत.
दुसऱ्या बाजूला पालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारीही याबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. ठेकेदार संथ गतीने काम करत असताना त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम व्यावसायिकांना भोगावा लागत आहे. पालिका आयुक्त राजेंद्र भोसले, आमदार भिमराव तापकीर, खासदार सुप्रिया सुळे यांनी याकडे लक्ष द्यावे व तातडीने काम पूर्ण करुन व्यावसायिकांना दिलासा द्यावा अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.