
पुणे ग्रामीण हद्दीत अवैध धंद्यांचा ‘खुला बाजार’! पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष की कानाडोळा?
पुणे ग्रामीण हद्दीत अवैध धंद्यांचा ‘खुला बाजार’! पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष की कानाडोळा?
पुणे: एका बाजूला जिल्हाभर कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले असताना दुसऱ्या बाजूला सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचा ‘खुला बाजार’ सुरू असल्याचे विदारक चित्र पुणे ग्रामीण पोलीस हद्दीत दिसून येत आहे. संपूर्ण जिल्हाभर अवैध धंद्यांचे स्तोम माजलेले असताना पोलीस कारवाया मात्र थंडावलेल्या आहेत. धक्कादायक म्हणजे पोलीस अधीक्षक सुद्धा अवैध धंदे बंद करण्यासाठी गंभीर नसल्याचे यावरुन दिसत आहे. त्यामुळे त्यांचे दुर्लक्ष होत आहे की जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे ग्रामीण हद्दीत आळेफाटा, बारामती शहर, बारामती तालुका, भिगवण, भोर, दौंड, घोडेगाव, हवेली, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, कामशेत,खेड, लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, माळेगाव,मंचर, नारायणगाव, ओतुर, पारगाव, पौड, राजगड, रांजणगाव, सासवड, शिक्रापूर, शिरुर, सुपा , उरुळी कांचन, वडगाव निंबाळकर, वडगाव मावळ,वेल्हा, वालचंदनगर व यवत हे पोलीस स्टेशन येतात. यातील पौड, शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर, दौंड, इंदापूर ही जास्त ‘महसूल’ मिळणारी पोलीस स्टेशन मानली जातात, त्यामुळे येथे पोस्टींग मिळविण्यासाठी पोलीस निरीक्षकांची ‘प्रयत्नांची पराकाष्ठा’ सुरू असते. इतरही पोलीस स्टेशन कमी आहेत असे मुळीच नाही! त्यामुळे पुणे ग्रामीण हद्दीतील पोलीस स्टेशनचे प्रभारीपद मिळविण्यासाठी नेहमीच चढाओढ पाहायला मिळते. अर्थातच पोस्टींग फायद्यात राहणार की ‘गुंतवणूक’ वाया जाणार हे सर्वस्वी अवलंबून असते पोलीस अधीक्षकांवर!
सध्या मात्र सर्वच पोलीस अधिकाऱ्यांची पोस्टींग फायद्यात असल्याचे चित्र दिसत आहे. गावठी दारू,ताडी, गांजा, जुगार मटका, हुक्का पार्लर असे सर्व धंदे कमी अधिक प्रमाणात जोमात खुलेआम सुरू आहेत. स्थानिक गुन्हे शाखाही अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत अत्यंत नरम असल्याने सर्व काही ठरवून सुरू आहे का अशी शंका उपस्थित केली जात आहे. पुणे ग्रामीण हद्दीत घडलेल्या गुन्हेगारी घटना पाहता पोलीस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अवैध धंदे आणि गुन्हेगारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही!