
सिंहगड परिसरातील वनसंपदा होरपळतेय, वनविभाग कशाची ऊब घेत बसलाय? लाखो हेक्टर क्षेत्राची राखरांगोळी
सिंहगड परिसरातील वनसंपदा होरपळतेय, वनविभाग कशाची ऊब घेत बसलाय? लाखो हेक्टर क्षेत्राची राखरांगोळी
सिंहगड: सिंहगड परिसरातील खडकवासला, नांदोशी, सणसनगर,डोणजे व इतर गावांमध्ये सध्या समाजकंटकांनी लावलेल्या आगीचा वनवा भडकलेला दिसत आहे. या आगीत वनस्पती,प्राणी,पक्षी व इतर वनसंपदा होरपळत असून वन विभाग मात्र आग नियंत्रणात आणण्यासाठी असमर्थ असल्याचे दिसून येत आहे. दररोज लाखो हेक्टर क्षेत्राची अक्षरशः राखरांगोळी होत आहे.
खडकवासला,नांदोशी व सणसनगर परिसरातील डोंगरांवर आगडोंब उसळलेला दिसत आहे. दूरवरून दिसत असलेली ही आग प्रत्यक्षात किती उग्र असेल याची कल्पना न केलेली बरी. या भागातील जंगलात असलेले लहानमोठे प्राणी,पक्षी व वनस्पतींची या आगीत अपरिमित हानी होत आहे. जिकडे नजर जाईल तिकडे ही आग भडकलेली दिसत आहे.
दुसऱ्या बाजूला आग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात वन विभाग याही वर्षी अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. सोप्या ठिकाणी जाळरेषा काढून त्याचे फोटोसेशन करण्यापलिकडे काहीही झालेले नाही. दरवर्षी अशाप्रकारे या परिसरातील वनसंपदेची राखरांगोळी होत असून दुर्दैवाने वन विभाग या मुक्या प्राण्यांच्या जीवंतपणी जळणाऱ्या चितेची ऊब घेऊन बसत असल्याचे असंवेदनशील चित्र दिसत आहे.