
महागाई,बेरोजगारी याबाबत उपाययोजना करुन शेतकरी, महिला, युवकांचे प्रश्न तातडीने सोडवावेत; राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तहसीलदारांना निवेदन
पुणे
तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार राज्यात सध्या युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला, कामगार, अंगणवाडी सेविका व इतर अनेक समाजघटक त्रस्त आहेत. कापूस, सोयाबीन, तूर, कांदा व इतर शेतमालाला योग्य भाव नाही. अतिवृष्टीमुळे किंवा काही ठिकाणी दुष्काळामुळे शेतमालाचे नुकसान झालेले असताना नुकसानभरपाई मिळत नाही. शासकीय नोकरभरती होत नाही आणि जेव्हा होते तेव्हा त्या भरतीला पेपरफुटीचे ग्रहण लागलेले आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत रात्रंदिवस एक करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकांवर या पेपरफुटीमुळे अन्याय होत आहे मात्र सरकारला याचे गांभीर्य नाही. राज्यात नवीन प्रकल्प येत नाही ऊलट राज्यातील प्रकल्प बाहेर जात आहेत. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. असे अनेक प्रश्न सध्या असताना सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा ग्रामीणचे अध्यक्ष त्र्यंबक मोकाशी, महिला अध्यक्षा राजेश्वरी पाटील, युवक अध्यक्ष सुधाकर गायकवाड, उपाध्यक्ष जितेंद्र कोंडे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सौरव कोंडे, शहर उपाध्यक्षा स्वाती पोकळे, पोपटराव खेडेकर, प्रभावती भूमकर, सुप्रिया भूमकर,नाना धोंडे , वैशाली थोपटे आदी उपस्थित होते.