
Sinhagad Viral video: विकृत पर्यटकांमुळे जगभर बदनामी; न्युझिलंडचा युट्यूबर ल्युकेथ याला अर्वाच्य शिव्या द्यायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल; विकृतांवर कठोर कारवाई करण्याची शिवप्रेमींची मागणी
Sinhagad Viral video: विकृत पर्यटकांमुळे जगभर बदनामी; न्युझिलंडचा युट्यूबर ल्युकेथ याला अर्वाच्य शिव्या द्यायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल; विकृतांवर कठोर कारवाई करण्याची शिवप्रेमींची मागणी
सिंहगड
न्युझीलंड या देशातील युट्यूबर ल्युकेथ काही दिवसांपूर्वी सिंहगडाला भेट देण्यासाठी आला होता. विशेष म्हणजे तो पायवाटेने अवघड चढण चढून गडावर गेला व सिंहगडाची ऐतिहासिक माहिती, ऐतिहासिक वास्तू यांची माहिती देणारा सविस्तर व्हिडिओ पाच दिवसांपूर्वी त्याने त्याच्या ‘ल्युकेथ एक्सप्लोरर’ या चॅनलवर टाकला आहे. आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
दरम्यान या व्हिडिओतून अत्यंत धक्कादायक व संतापजनक गोष्टी समोर आल्या आहेत. पायवाटेवर काही विकृत प्रवृत्तीच्या तरुण पर्यटकांनी ल्युकेथ च्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याला अत्यंत अर्वाच्य शिव्या शिकवल्या व त्याच्याकडून वदवून घेतल्या. सध्या ल्युकेथ च्या व्हिडिओतील हा भाग समाज माध्यमांतून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. मराठी भाषेची, महाराष्ट्राची या विकृतांमुळे जगभर बदनामी झाल्याने त्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
काही वर्षांपूर्वी सिंहगडाच्या पायवाटेवर शस्त्राचा धाक दाखवून पर्यटकांना लुटल्याची घटना घडली होती. तसेच मारहाणीच्या, वादावादीच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या सिंहगडावर देश विदेशातून पर्यटक भेट देण्यासाठी येतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना येथे नाही. सातत्याने असे गैरप्रकार घडत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. न्यूझीलंड युट्यूबर ल्युकेथ याच्यासोबत घडलेल्या या विकृत प्रकारामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वन विभाग, पुणे ग्रामीण पोलीस यांनी याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.