
“कर्नाटकात कोळशाच्या खाणीवर काम करायचो…… थोडे दिवस झाले आलतो इकडं. राती दारु आणून दे थोडी म्हणला दुखतंय… पिऊन झोपला सकाळी उठवते तर नाही उठला…..आता काय करु?”… पतीच्या मृत्यूनंतर व्यथा सांगताना हतबल झालेल्या खडकवासला येथील आदिवासी कातकरी महिलेचे डोळे पाणावले
“कर्नाटकात कोळशाच्या खाणीवर काम करायचो…… थोडे दिवस झाले आलतो इकडं. राती दारु आणून दे थोडी म्हणला दुखतंय… पिऊन झोपला सकाळी उठवते तर नाही उठला…..आता काय करु?”… पतीच्या मृत्यूनंतर व्यथा सांगताना हतबल झालेल्या खडकवासला येथील आदिवासी कातकरी महिलेचे डोळे पाणावले
खडकवासला
घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत तोडक्या मोडक्या शब्दात बोलताना गंगूबाई म्हणतेय, “आम्ही कर्नाटकात कोळशाच्या खाणीत काम करत व्हतो. थोडे दिस झाले आलतो इकडं. संध्याकाळी त्यो म्हणला आंग दुखतंय थोडी दारु आणून दे. दारू पिऊन झोपला. जेवला नवता. सकाळी उठवायला गेले तर उठला नाय. मरुण पडला व्हता. उशीर झाला असण मरुण, फुगला व्हता. नातेवाईक गोळा झाले. मयत करायला सामान द्यायनात. कागद मागत व्हते. कुठून आणू कागद. आमच्याकडं कसला कागद. काम करुन खात व्हतो. चांगला व्हता त्यो. दुखत नवतं. पण मेला. आता काय करु?”
दत्ता जाधव यांची पत्नी बोलताना भावनिक होते. आधार गेल्याचे भाव तिच्या बोलण्यातून आणि चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होते. अधूनमधून येणारा दबका हुंदका आणि ओघळणारे अश्रूंचे थेंब तिच्या भावनांना वाट मोकळी करून देत होते. आपला आयुष्यभराचा साथीदार गेल्याचं दुःख तिला जरी शब्दात व्यक्त करता येत नसलं तरी आता मी काय करू? हे एक वाक्य त्यासाठी पुरं होतं. दत्ता जाधव यांच्या मृत्यूनंतर शासन प्रशासनाची अब्रू वेशीला टांगली गेली आहे. मयत करण्यासाठी दाखला हवा होता परंतु आधार कार्ड नसल्यामुळे डॉक्टर दाखला देत नव्हते, यात मृत व्यक्तीचा, त्या दुर्दैवी पत्नीचा आणि कोणीतरी मदतीसाठी येईल अशी आस लावून बसलेल्या नातेवाईकांचा दोष काय? एकीकडे देश महासत्ता होणार अशा बाता मारल्या जात असताना दुसरीकडे आधार कार्ड अभावी मृतदेह तासंतास पडून राहत आहेत हे दुर्दैव. पतीच्या मृत्यूनंतर अगतीक झालेली सरकारची अभागी बहीण आणि तिचे शब्द सरकारसाठी झणझणीत अंजन घालणारे आहेत.