♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

रिंग रोडचे काम करणाऱ्या ‘नवयुगा’चा हलगर्जीपणा; वरदाडे येथे अपघातांचा धोका, हवेली पोलीस गप्प का?

रिंग रोडचे काम करणाऱ्या ‘नवयुगा’चा हलगर्जीपणा; वरदाडे येथे अपघातांचा धोका, हवेली पोलीस गप्प का?

पुणे-पानशेत रस्त्यावर अनेक दिवसांपासून खोदकाम करून रस्ता अर्धवट अवस्थेत; एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने वाहनचालकांची कसरत, नुकताच एका 13 वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू

पुणे : पुणे रिंग रोडच्या W3 व W4 स्कोपचे काम करणाऱ्या ‘नवयुगा’ कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पुणे-पानशेत रस्त्यावर वरदाडे येथे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुख्य रस्ता अनेक दिवसांपासून खोदून ठेवण्यात आला असून, काम अर्धवट अवस्थेत असल्याने या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे. एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी नुकत्याच झालेल्या अपघातात एका 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पुणे रिंग रोडच्या कामासाठी वरदाडे येथे पुणे-पानशेत मुख्य रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, अनेक दिवस उलटूनही हे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. खोदलेल्या रस्त्याच्या ठिकाणी वाहनांची सुरक्षित ये-जा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. रस्ता खोदताना आणि वाहतूक वळविताना करारातील तरतुदींनुसार आवश्यक सुरक्षा व्यवस्था, सूचना फलक आणि इतर खबरदारी घेणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, रस्ता अर्धवट खोदून ठेवल्यामुळे वाहनचालकांना एकाच बाजूने ये-जा करावी लागत आहे. परिणामी वाहनांचा गोंधळ उडत असून, समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या ठिकाणची परिस्थिती अधिक धोकादायक बनत आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या अपघातात एका 13 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतरही संबंधित कंपनीकडून रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी हालचाली होताना दिसत नाहीत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) नेमकी कोणती भूमिका घेत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

दुसरीकडे, सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीला धोका निर्माण होत असताना हवेली पोलिसांकडूनही संबंधित कंपनीवर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघातांचा धोका स्पष्टपणे दिसत असतानाही प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कारवाईची वाट का पाहत आहेत? आणखी किती अपघात झाल्यानंतर संबंधित यंत्रणांना जाग येणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नवयुगा कंपनीच्या कामाची गुणवत्ता, सुरक्षा उपाययोजना आणि करारातील अटींची अंमलबजावणी यांची MSRDC ने तातडीने चौकशी करावी. तसेच हवेली पोलिसांनीही वाहतुकीला धोका निर्माण करणाऱ्या निष्काळजीपणाची दखल घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी. अन्यथा, रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आणखी एखाद्याचा बळी जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles