
नांदोशी येथे अवजड डंपर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली
नांदोशी येथे अवजड डंपर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली
नांदोशी : नांदोशी परिसरात अवजड डंपर पलटी झाल्याची घटना घडली. डंपर रस्त्याच्या कडेला पलटी होऊन थेट घराच्या दिशेने झुकला; मात्र सुदैवाने तो घरावर पडला नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या परिसरात अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून, रस्त्याची दुरवस्थाही नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. खराब रस्ता, अरुंद मार्ग आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
नांदोशी परिसरात यापूर्वीही सातत्याने अपघाताच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एखाद्या घरावर किंवा नागरिकांवर वाहन कोसळून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली, तरी भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.











