
Khadakwasla Crime :दोन गावठी पिस्तुलांसह आरोपीला नांदेड सिटी पोलिसांनी केली अटक;नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची कारवाई; ९० हजारांचा मुद्देमाल जप्त
दोन गावठी पिस्तुलांसह आरोपीला नांदेड सिटी पोलिसांनी केली अटक;नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची कारवाई; ९० हजारांचा मुद्देमाल जप्त
पुणे : नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदा गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मारुती उर्फ मारी बाळू चव्हाण (वय 26, रा. यशवंत विद्यालयाजवळ, लांडगे वस्ती, खडकवासला, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 272/2026 नुसार आर्म्स ॲक्ट कलम 3, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 ऑगस्ट 2026 रोजी मारुती चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले असून, या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 90 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
मारुती चव्हाण हा अल्पवयीन असल्यापासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तसेच या शस्त्रांचा वापर कोणत्या कारणासाठी केला जाणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली. जप्त करण्यात आलेली शस्त्रे कुठून आणण्यात आली आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पुढील तपास सुरू आहे.











