
अपघातावेळी फॅन्सी नंबर प्लेट; अपघातानंतर डॅशबोर्डवर HSRP प्लेट; काचाही पूर्ण काळ्या तरीही कारवाई नाही;हवेली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अपघातावेळी फॅन्सी नंबर प्लेट; अपघातानंतर डॅशबोर्डवर HSRP प्लेट; काचाही पूर्ण काळ्या तरीही कारवाई नाही;हवेली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
(निलेश बोरुडे: संपादक – द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)
पुणे : 15 जुलै रोजी झालेल्या एका कार अपघातानंतर वाहनाच्या नंबर प्लेटबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपघाताच्या वेळी संबंधित कारवर फॅन्सी नंबर प्लेट असल्याचे छायाचित्रांवरून दिसत असताना, अपघातानंतर हवेली पोलीस स्टेशनसमोर उभ्या असलेल्या त्याच वाहनाच्या डॅशबोर्डवर HSRP नंबर प्लेट ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे वाहनाच्या नंबर प्लेटमध्ये नेमका बदल कधी आणि का करण्यात आला, असा सवाल उपस्थित होत आहे.
उपलब्ध छायाचित्रांनुसार, अपघातापूर्वी/अपघाताच्या वेळी कारच्या पुढील बाजूस ‘3332’ असा फॅन्सी नंबर दिसत आहे. त्यानंतर अपघातग्रस्त अवस्थेतील वाहनाच्या डॅशबोर्डवर MH12ZG3332 क्रमांकाची HSRP नंबर प्लेट ठेवलेली दिसते. विशेष म्हणजे ही प्लेट वाहनाच्या पुढील बाजूस बसवलेली नसून डॅशबोर्डवर ठेवलेली असल्याचे छायाचित्रात स्पष्टपणे दिसून येते.
याशिवाय, संबंधित वाहनाच्या काचा मोठ्या प्रमाणात काळ्या असल्याचेही छायाचित्रांवरून दिसते. वाहनाची अवस्था, नंबर प्लेटमधील फरक आणि काचांवरील काळेपणा या सर्व बाबींची पोलिसांनी तपासणी केली आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
अपघातानंतर नंबर प्लेट बदलण्याची गरज का पडली?
15 जुलै रोजी अपघात झाल्यानंतर वाहन हवेली पोलीस स्टेशनसमोर आणण्यात आले. त्यावेळी वाहनावर कोणती नंबर प्लेट होती, ती पंचनाम्यात नमूद करण्यात आली आहे का, तसेच नंतर डॅशबोर्डवर ठेवण्यात आलेली HSRP नंबर प्लेट नेमकी कधी उपलब्ध झाली, याची माहिती समोर येणे आवश्यक आहे.
अपघाताच्या वेळी असलेली नंबर प्लेट आणि त्यानंतर वाहनासोबत आढळलेली नंबर प्लेट यामध्ये फरक असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे आहे.
हवेली पोलिसांची भूमिका संशयास्पद का ठरते?
वाहन पोलीस ठाण्याच्या ताब्यात किंवा परिसरात असताना त्यावरील नंबर प्लेट, काचा आणि वाहनाची मूळ अवस्था यांची नोंद केली जाते का, हा तपासाचा विषय आहे. जर अपघाताच्या वेळी फॅन्सी नंबर प्लेट होती आणि नंतर HSRP प्लेट डॅशबोर्डवर आढळली असेल, तर या बदलाची नोंद पोलिसांच्या कागदपत्रांमध्ये आहे का, याचे उत्तर मिळणे आवश्यक आहे.
तसेच वाहनाच्या काचा काळ्या असल्याचे दिसत असतानाही संबंधित नियमांनुसार कारवाई करण्यात आली का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.या प्रकरणात कोणावरही आरोप सिद्ध झालेला आहे, असा दावा नाही. मात्र उपलब्ध छायाचित्रांमधील परिस्थिती आणि नंबर प्लेटमधील फरक यामुळे हवेली पोलिसांनी या सर्व बाबींची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.
पोलिसांकडून स्पष्टता अपेक्षित
15 जुलैच्या अपघातापासून वाहन हवेली पोलीस स्टेशनसमोर उभे राहेपर्यंत नंबर प्लेटमध्ये नेमके काय घडले? वाहनाच्या पंचनाम्यात कोणती नंबर प्लेट नमूद आहे? HSRP प्लेट डॅशबोर्डवर कोणी ठेवली? वाहनाच्या काळ्या काचांबाबत कारवाई का झाली नाही? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे गरजेचे आहे.











