
किरकटवाडी येथे अन्न व औषध प्रशासनाचा छापा; गुटख्याचा मोठा साठा जप्त, परिसरात खळबळ
किरकटवाडी येथे अन्न व औषध प्रशासनाचा छापा; गुटख्याचा मोठा साठा जप्त, परिसरात खळबळ
पुणे : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी परिसरातील देडगे कॉर्नर इमारतीमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकत मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, श्रावण परमार असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातील ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि संबंधित साहित्य आढळून आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, याबाबत नांदेड सिटी पोलीस ठाण्याकडून आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी जप्त करण्यात आलेल्या गुटख्याच्या साठ्याची मोजणी व पंचनामा करण्याचे काम करत असून, साठ्याची नेमकी किंमत आणि त्यामागील रॅकेटबाबत तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध गुटखा व्यवसायावर मोठा आघात बसल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, गुटखा कोठून आणला जात होता आणि त्याचे वितरण कुठे केले जात होते, याचा तपास अन्न व औषध प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनी अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.











