
बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा करवीर पोलिसांकडून पर्दाफाश; सात जणांविरुद्ध गुन्हा
बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा करवीर पोलिसांकडून पर्दाफाश; सात जणांविरुद्ध गुन्हा
(कोल्हापूर | प्रतिनिधी)
करवीर पोलिसांनी बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत मुख्य आरोपीसह दोन महिला एजंटांना ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना 26 जुलै 2026 रोजी गुप्त माहिती मिळाली की, कळंबा येथील थ्री स्टार लॉजमध्ये स्वप्निल केरवा पाटील हा एजंटमार्फत आणलेल्या महिलांची बेकायदा गर्भलिंग तपासणी करत आहे. या माहितीच्या आधारे करवीर पोलिसांच्या पथकाने लॉजवर छापा टाकला.
कारवाईदरम्यान स्वप्निल पाटील हा गर्भलिंग तपासणी करून वाहनातून बाहेर पडताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता त्याने वाहनातून एका महिलेला उतरवून भरधाव वेगाने पळ काढला. संबंधित महिलेची चौकशी केली असता एजंट मनीषा दिनकर कांबळे (वय 37, रा. सावर्डे पाटण, ता. राधानगरी) हिने तिला गर्भलिंग तपासणीसाठी आणल्याचे सांगितले. तसेच तिच्यासोबत आणखी दोन महिलांचीही गर्भलिंग तपासणी झाल्याची माहिती समोर आली.
या दोन्ही महिलांना एजंट अश्विनी गजानन शिंदे (वय 38, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) हिने आणल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मनीषा कांबळे आणि अश्विनी शिंदे या दोघींना ताब्यात घेण्यात आले.
या गुन्ह्यात किरण चव्हाण, संतोष कोळी तसेच बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीसाठी लॉज उपलब्ध करून देणारा थ्री स्टार लॉजचा मालक अशा आणखी आरोपींचा समावेश असून एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 11, 319(2), 3(5) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम आणि PCPNDT कायद्याच्या कलम 5, 18 व 23 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कळकुटे, सुहास पवार, सहाय्यक फौजदार राहुल देसाई तसेच करवीर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.










