
मॅडमचे दाखवायचे आणि ‘खायचे’दात वेगळे;एक कोटी दरोडा प्रकरणानंतर बंटी-बबलीच्या जोडीची चर्चा; पुरस्कारांसाठी ‘सेटिंग’चेही आरोप
मॅडमचे दाखवायचे आणि ‘खायचे’दात वेगळे;एक कोटी दरोडा प्रकरणानंतर बंटी-बबलीच्या जोडीची चर्चा; पुरस्कारांसाठी ‘सेटिंग’चेही आरोप
पुणे:एक कोटी रुपयांच्या कथित दरोडा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तथाकथित पत्रकार आशिष तिवारी आणि राजगड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रमिला निकम यांची जोडी पुन्हा चर्चेत आली आहे. या दोघांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीबाबत विविध स्तरांतून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
माहितीनुसार, आशिष तिवारी आणि प्रमिला निकम यांची ‘बंटी-बबली’ म्हणून ओळख निर्माण झाली होती. विविध सामाजिक संस्था व संघटनांकडून प्रमिला निकम यांना पुरस्कार मिळावेत यासाठी तिवारी कथितरित्या ‘सेटिंग’ करत असल्याचे आरोप होत आहेत. परिणामी, जवळपास प्रत्येक पंधरा दिवसांनी किंवा महिन्याला एखादा पुरस्कार स्वीकारतानाचे फोटो आणि प्रसिद्धी सोशल मीडियावर झळकत असल्याची चर्चा होती.
स्वतःला ‘दबंग पोलीस’ अशी प्रतिमा देण्याचा प्रयत्न प्रमिला निकम यांनी केल्याचेही बोलले जात होते. मात्र, आता एक कोटी दरोडा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे” अशी प्रतिक्रिया अनेक स्तरांतून व्यक्त होत असल्याचा दावा केला जात आहे.
या प्रकरणानंतर आशिष तिवारी आणि प्रमिला निकम हे दोघे मिळून नेमके कोणते व्यवहार करत होते, त्यांची परस्पर भूमिका काय होती आणि पुरस्कारांच्या माध्यमातून उभी करण्यात आलेली प्रतिमा कितपत वास्तव होती, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी व्यक्त होत आहे.दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित आरोपांबाबत अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रिया आणि तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्व आरोप हे सध्या चौकशीच्या आणि न्यायप्रक्रियेच्या अधीन आहेत.










