
Breaking News: तोतया पत्रकार आशिष तिवारी खेडशिवापूर पोलीस चौकीतील पोलीस हवालदार प्रमिला निकम, अजीज मेस्त्री यांचा एक कोटींच्या दरोड्याच्या कटात सहभाग उघड; तिवारीला पुणे पोलीसांकडून अटक तर निकम, मेस्त्री फरार; पुणे ग्रामीण पोलीस दलात पुन्हा खळबळ
Breaking News: तोतया पत्रकार आशिष तिवारी खेडशिवापूर पोलीस चौकीतील पोलीस हवालदार प्रमिला निकम, अजीज मेस्त्री यांचा एक कोटींच्या दरोड्याच्या कटात सहभाग उघड; तिवारीला पुणे पोलीसांकडून अटक तर निकम, मेस्त्री फरार; पुणे ग्रामीण पोलीस दलात पुन्हा खळबळ
पुणे: स्टेशनरी व्यवसायिकाच्या तब्बल एक कोटी रुपये रकमेवर दरोडा प्रकरणात अत्यंत धकादायक गोष्टी समोर आल्या असून याप्रकरणी तोतया भामटा तथाकथित पत्रकार आशिष सुबालाल तिवारी (वय अंदाजे 40 रा माणिक बाग सिंहगड रोड) याच्यासह पुणे ग्रामीण राजगड पोलीस स्टेशन अंकित खेड शिवापूर पोलीस चौकीतील पोलीस हवालदार प्रमिला निकम व अजित मेस्त्री यांच्या विरोधात नऱ्हे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तथाकथित पत्रकार आशिष तिवारी याला अटक करण्यात आली आहे तर प्रमिला निकम व अजीज मेस्त्री हे पोलीस कर्मचारी फरार झाले आहेत.
18 जुलै रोजी संबंधित व्यावसायिक एक कोटी रुपये नऱ्हे येथील बँकेत भरणा करण्यासाठी निघाला होता. नवले पुलाजवळ अज्ञातांनी पोलीस असल्याची बतावणी करत कार अडवली व रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान झटापट सुरू असताना कारचालकाने कार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नेण्याऐवजी थेट खेडशिवापूर पोलीस चौकीत नेली. कारचालक विक्रम विलास चाकणकर हा या कटात सहभागी असल्याचे नंतर उघड झाले.
रोकड घेऊन संबंधित आरोपी खेडशिवापूर पोलीस चौकीत गेल्यानंतर तेथे विक्रम चाकणकर, अमेय कारले, गणेश कदम, आशिष तिवारी, प्रमिला निकम, अजिज मेस्त्री यांच्यामध्ये वाटाघाटी झाल्या. त्या ठिकाणीही झटापटी झाल्याचे ऐकायला मिळत आहे.
याबाबत संबंधित व्यवसायिकाने नऱ्हे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने विक्रम चाकणकर अमेय कारले गणेश कदम यांना अटक केली होती. परंतु तोतया पत्रकार आशिष तिवारी तथाकथित दबंग पोलीस कर्मचारी प्रमिला निकम व अजिज मेस्त्री हे मोकाट होते.
व्यवसायिकाच्या एक कोटी रुपयांवर दरोडा टाकण्यासाठी आरोपी विक्रम चाकणकर, अमेय कारले, गणेश कदम व तथाकथित पत्रकार आशिष तिवारी, पोलीस हवालदार प्रमिला निकम, अजित मेस्त्री यांनी अत्यंत नियोजनबद्धपणे कट रचला होता. परंतु राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्यामुळे हा डाव फसला. नऱ्हे पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार सुरू झाल्याने राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी नऱ्हे पोलिसांना याबाबत माहिती दिली होती . अखेर पुणे शहर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
आशिष तिवारी खेडशिवापूर पोलीस चौकीत पडीक
दरम्यान मागील काही काळापासून आशिष तिवारी हा खेड शिवापूर पोलीस चौकीत पडीक होता. त्याने व पोलीस हवालदार प्रमिला निकम यांनी मिळून परिसरातील व्यावसायिक किंवा धंदेवाले यांना धमकावून वसुली केली आहे काय याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. पीडित नागरिकांनी याबाबत न घाबरता तक्रार करणे आवश्यक आहे.
गांजा व्यापाऱ्यासाठी काम
तथाकथित पत्रकार आशिष तिवारी व खडकवासला येथील कुख्यात गांजा व्यापारी रामदास सोनवणे याची जवळीक होती. पूर्वी खडकवासला परिसरात आशिष तिवारी याचा वावर असायचा. गांजा व्यापाऱ्याला वाचविण्यासाठी आशिष तिवारी खोटी साक्ष देऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभूल करत होता.
कसला पत्रकार?
आपण खूप मोठे पत्रकार आहोत हे दाखविण्यासाठी आशिष तिवारी अधिवेशन काळातील मंत्र्यांसोबतचे फोटो किंवा इतर काही फोटो समाज माध्यमांवर टाकायचा. वास्तविक पाहता त्याची कुठेही बातमीदारी दिसून येत नव्हती. त्याने केलेल्या बातम्या कुठेही दिसत नव्हत्या. फक्त बनवाबनवी करून अनेकांची दिशाभूल करत होता. त्याच्या बोलण्यावरून प्रतिष्ठित लोकांना फसवत होता.
मोक्का लागणार का?
अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून या टोळीने हा गुन्हा केला होता. धक्कादायक म्हणजे यात समाजातील महत्त्वाचे घटक असलेल्या पत्रकार व पोलिसांचा सहभाग आहे. यातील काही आरोपींवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. भविष्यात असे गुन्हे घडू नयेत म्हणून या टोळीवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का नुसार कारवाई होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल यांनी या प्रकाराची अत्यंत गांभीर्याने दखल घेतलेली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर
नुकतेच काही दिवसांपूर्वी लोणावळा परिसरात पाच लाख रुपयांसाठी पोलिसांनीच पर्यटकांचे अपहरण केले होते. याप्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुणे ग्रामीण पोलीस दलातील खेडशिवापूर पोलीस चौकीतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा थेट दरोड्याच्या कटात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.








