
Crime News: तब्बल पंधरा लाखांची ॲसिड चोरी करणारी टोळी नांदेड सिटी पोलिसांकडून तीन तासांत जेरबंद; चोरीसाठी वापरलेल्या पिकअपसह वीस लाखांचा मुद्देमाल जप्त
Crime News: तब्बल पंधरा लाखांची ॲसिड चोरी करणारी टोळी नांदेड सिटी पोलिसांकडून तीन तासांत जेरबंद; चोरीसाठी वापरलेल्या पिकअपसह वीस लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे: खते, सौंदर्य प्रसाधने, बंद पाकीटातील अन्नपदार्थ व शितपेये, धातू प्रक्रीया तसेच वैद्यकीय अशा विविध कारणांसाठी बहुपयोगी असलेल्या ऑर्थो फॉस्फेरिक अर्थात फॉस्फेरिक ॲसिडची चोरी करणाऱ्या टोळीला नांदेड सिटी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत जेरबंद करत तब्बल वीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वैभव बाळासाहेब चव्हाण (वय 26 रा मॅपल रेसिडेन्सी धायरी), रोहन संतोष इंदुलकर (वय 29 रा मॅपल रेसिडेन्सी धायरी) व निखिल तानाजी पवार (वय 23 रा आकाश होम्स पोकळे वस्ती धायरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
धायरी गावच्या हद्दीतून जाणाऱ्या खडकवासला कालव्यालगत असलेल्या रिलायबल केमिकल्स या कंपनीच्या गोडाऊनमधून आरोपींनी प्रत्येकी 25 लिटर फॉस्फेरिक ॲसिडच्या तब्बल 154 कॅनची चोरी केली होती. चोरी केलेल्या ॲसिडची किंमत तब्बल 15 लाख चाळीस हजार इतकी होती. सदर चोरीसाठी आरोपींनी एका पिक अप गाडीचा वापर केला होता.
याबाबत माहिती मिळताच नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संग्राम शिनगारे, शिवाजी क्षीरसागर व मोहन मिसाळ यांनी गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढत तीन तासांच्या आत आरोपींना जेरबंद केले. अधिक तपासातून आरोपींकडून मुद्देमाल व चोरीत वापरलेली पिक अप जप्त करण्यात आली.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, झोन तीनचे पोलीस उपायुक्त सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या सूचनेनुसार नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रसाद राऊत, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार संग्राम शिनगारे, शिवाजी क्षीरसागर,मोहन मिसाळ, निलेश कुलथे अक्षय जाधव, सतीश खोत, स्वप्निल मगर, निलेश खांबे,राजू वेगरे, प्रतिक मोरे,भिमराज गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली. नांदेड सिटी पोलीस पुढील तपास करत आहेत.







