
मुलाला जेवणाचा डबा घेऊन जात असलेल्या वडीलांवर काळाचा घाला; पिकअपने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; एनडीए- बहुली रस्त्यावरील मांडवी बुद्रुक येथील धक्कादायक घटना
मुलाला जेवणाचा डबा घेऊन जात असलेल्या वडीलांवर काळाचा घाला; पिकअपने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; एनडीए- बहुली रस्त्यावरील मांडवी बुद्रुक येथील धक्कादायक घटना
मांडवी बुद्रुक,पुणे: कामावर असलेल्या मुलाला जेवणाचा डबा घेऊन जात असलेल्या वडीलांवर काळाने घाला घातला असून पोल्ट्री व्यावसायिकाच्या पिक अपने समोरुन दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वडीलांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुंजाराम सुंदरराव मरकड (वय 65) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पुंजाराम मारकड हे आपल्या मुलासाठी नेहमीप्रमाणे जेवणाचा डबा घेऊन जात होते. मांडवी बुद्रुक येथील पुलाजवळ अचानक भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ते उडून खड्ड्यात फेकले गेले व दुचाकीचा चुराडा झाला. तसेच चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअपही उलटून पडली. यात मारकड यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर व हवेली पोलीस स्टेशन अशा दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सदर ठिकाण पुणे ग्रामीण हवेली पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने हवेली पोलीसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान मयत पुंजाराम मारकड यांच्या मुलाने पोलीस पिकअप चालकाला वाचवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. तसेच पिकअप चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे मुलाने द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस शी बोलताना सांगितले. त्यामुळे चालकाची तातडीने वैद्यकीय तपासणी करून हवेली पोलीसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.








