
नांदोशीला जाणारा रस्ता मोठा करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर मंजुषा नागपुरे यांना मनोगत व्यक्त करत असताना निर्देश; ‘त्या’ पर्यायी रस्त्याचा मार्ग मोकळा?
नांदोशीला जाणारा रस्ता मोठा करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर मंजुषा नागपुरे यांना मनोगत व्यक्त करत असताना निर्देश; ‘त्या’ पर्यायी रस्त्याचा मार्ग मोकळा?
पुणे: एवढं मोठं रुग्णालय या भागात उभं राहत आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यापासून नांदोशी गावापर्यंत मोठा रस्ता असायला हवा. थेट हॉस्पिटलमध्ये येता यावं असा रस्ता करा आणि मुबलक पाणीपुरवठा होईल अशी व्यवस्था करा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांना दिले. नांदोशी येथील प्रस्तावित लताआशा मंगेशकर रुग्णालयाच्या कोनशिला अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
सिंहगड रस्त्यापासून किरकटवाडी ते नांदोशी हा एकमेव रस्ता सद्यस्थितीत उपलब्ध असून सध्याच्या लोकवस्तीच्या दृष्टीने तो अत्यंत अरुंद आहे. रुग्णालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर व परिसरात नागरिकरण वाढल्यानंतर रस्त्याची समस्या निर्माण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच प्रश्नाकडे महापौर मंजुषा नागपुरे यांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमादरम्यान भाषण सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा रस्ता करण्याचे निर्देश दिले. तसेच पाणीपुरवठा योजना राबविण्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी रस्त्याच्या समस्येवर बोट ठेवल्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. रुग्णालयाचे काम पूर्ण होईपर्यंत सुसज्ज रस्ता उपलब्ध होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुणे मनपा प्रशासन याबाबत काय कार्यवाही करतेय त्याचे उत्तर येत्या काळात मिळणार आहे.
2013 साली मंजूर पर्यायी रस्त्याचा मार्ग मोकळा होणार?
महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागाने महामार्गापासून नऱ्हे धायरी खडकवासला असा TP5/1809/650/CR/1654/09UD13 हा पर्यायी रस्ता 2013 साली मंजूर केलेला आहे. तब्बल 13 वर्षे सदर रस्ता करण्याबाबत प्रशासनाने कोणतीही हालचाल केलेली नाही. आता मात्र सदर रस्ता होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर पर्यायी रस्ता झाल्यास नांदोशी, किरकटवाडी व खडकवासला या भागात झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे.







