
Khadakwasla: गॅससाठी नागरिकांच्या रांगा; स्थलांतरित मजूर-हातावर पोट असणाऱ्यांची होरपळ;काळा बाजार तेजीत
Khadakwasla: गॅससाठी नागरिकांच्या रांगा; स्थलांतरित मजूर-हातावर पोट असणाऱ्यांची होरपळ;काळा बाजार तेजीत
खडकवासला: जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धाची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत असून मागील काही दिवसांपासून खडकवासला येथील गॅस एजन्सीबाहेर सिलिंडर मिळवण्यासाठी पहाटेपासून रांगा लागत आहेत. काम सोडून नागरिक रांगेत थांबत असल्याने हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होत चालल्याने सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढत आहे.

खडकवासला परिसरात स्थलांतरित मजूर, कामगार, नोकरदार व लहान व्यावसायिकांची संख्या जास्त आहे. आर्थिक अडचणींमुळे यातील अनेक नागरिकांकडे केवळ एकच गॅस टाकी आहे. त्यामुळे संपल्यानंतर ते दुसरी घ्यायला जातात. अगोदर लगेच मिळणारे सिलिंडर आता बुक केले तरी वेळेत मिळत नसल्याने नागरिक रांगेत थांबत आहेत. गॅस नसेल तर खायचे काय? असा प्रश्न समोर असल्याने नागरिकांना काम सोडून व रोजगार बुडवून रांगेत थांबावे लागत आहे.
छोट्या सिलिंडर साठी हजार ते पंधराशे
परिसरात हजारो स्थलांतरित मजूर वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे शेगडी व सिलिंडर एकत्रित असलेले मिनी सिलिंडर आहेत. काही दुकानदार हे सिलिंडर विक्री करतात. अगोदर पाचशे ते सातशे रुपयांना मिळणारे हे मिनी सिलिंडर आता हजार ते पंधराशे रुपयांना विकत घ्यावे लागत आहे.
नियमित सिलिंडरचाही काळा बाजार तेजीत
परिसरात नियमित सिलिंडरचाही काळा बाजार तेजीत सुरू आहे. दोन ते तीन हजार रुपयांना सिलिंडर विकला जात आहे. एका बाजूला बुकींग करुन ग्राहकांना वेळेत सिलिंडर मिळत नाहीत तर दुसऱ्या बाजूला काळ्या बाजारात मात्र राजरोसपणे विक्री सुरू आहे.







