
पैसे द्या नाहीतर नोंद रद्द! कोंढवेधावडे मंडळ अधिकाऱ्यांची राजरोसपणे नोंदीत अनागोंदी; तक्रारींचा पाऊस, विधानसभेतही ‘अतारांकीत’; तातडीने कारवाई करण्याची मागणी
पैसे द्या नाहीतर नोंद रद्द! कोंढवेधावडे मंडळ अधिकाऱ्यांची राजरोसपणे नोंदीत अनागोंदी; तक्रारींचा पाऊस, विधानसभेतही ‘अतारांकीत’; तातडीने कारवाई करण्याची मागणी
कोंढवेधावडे (ता हवेली):वारस नोंद, खरेदी नोंद, तहसील कार्यालयातून आदेश झाल्यानंतर दुरुस्ती नोंद किंवा इतर कोणतीही नोंद असो किंवा मंडळ अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत येणारे कोणतेही काम असो कोंढवे धावडे महसुली मंडळ अधिकारी भारत रुपनवर हे ‘महसूल’ घेतल्याशिवाय मंजूर करत नाहीत. अपेक्षित महसूल मिळाला नाही तर काहीतरी कारण काढून नोंद रद्द केली जाते किंवा जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते. मंडळ अधिकाऱ्यांच्या या जाचक जिझिया कर वसुली पद्धतीमुळे सर्वसामान्य शेतकरी हैराण झाले असून याबाबत हवेली तहसीलदार ते थेट महसूलमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. कोंढवे धावडे महसुली मंडळात नोंदींमध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची सखोल चौकशी करून तातडीने मंडळ अधिकारी भारत रुपनवर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मंडळ अधिकारी भारत रुपनवर यांनी पदभार स्विकारल्यापासून मनमानी कारभार सुरू केलेला आहे. मंडळातील सर्व गावांतील शेतकरी, मिळकत धारक एवढेच नाही तर महसूल कर्मचारी सुद्धा त्यांच्या कारभारामुळे वैतागले आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांनी 29 एप्रिल 2025 रोजी विधिमंडळात अतारांकित प्रश्न क्र 932 नुसार कोंढवे धावडे महसुली मंडळातील नोंदींमुळे होत असलेल्या गैरसोईचा मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते.
मंडळ अधिकारी भारत रुपनवर यांचा कारभार केवळ वैयक्तिक फायद्यासाठी सुरू आहे. आपलं कोणीच काही करु शकत नाही अशा आविर्भावात ते सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांची अक्षरशः पिळवणूक करत आहेत. एका बाजूला शासन गतिमान झाल्याचा दावा राज्य सरकार करत असताना असे महसूल अधिकारी या गतिमान शासनाची आब्रु वेशीवर टांगत आहेत. हवेली तहसीलदार, हवेली उपविभागीय अधिकारी, पुणे जिल्हाधिकारी यांनी याबाबत तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. भारत रुपनवर यांच्या विरोधात असलेल्या तक्रारींची दखल घेऊन तातडीने सखोल चौकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकारी भारत रुपनवर यांना पाठीशी घालतात की कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








