
किरकटवाडी-नांदोशी रस्त्याची दुरवस्था; पाणी आणि खड्डे असल्याने दररोज अपघात; संतप्त नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा
किरकटवाडी-नांदोशी रस्त्याची दुरवस्था; पाणी आणि खड्डे असल्याने दररोज अपघात; संतप्त नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा
किरकटवाडी: किरकटवाडी-नांदोशी रस्त्याची मागील काही महिन्यांपासून अत्यंत दुरावस्था झालेली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने व त्यात पाणी साचलेले असल्याने दररोज अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. पालिकेच्या पथ विभागाकडून दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने या भागातील रहिवासी संतप्त झाले असून येणाऱ्या पालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.
किरकटवाडी फाटा ते गावठाणापर्यंत, माळवाडी ते यशवंत नगर आणि पुढे नांदोशी ते सणसनगर अशा ठिकाणी रस्ता इतका खराब झाला आहे की पायी चालणे कठीण आहे. साचलेल्या पाण्यात वाहनाचे चाक गेले की पायी चालणारे विद्यार्थी, नागरिक यांच्या अंगावर पाणी उडून नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. यशवंतनगर येथे तर अक्षरशः रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. तेथील रहिवाशांनी पालिकेकडे लेखी स्वरूपात तक्रारी केल्या तरिही दखल घेण्यात आलेली नाही.
खराब रस्त्यामुळे किरकटवाडी, नांदोशी, वांजळवाडी व सणसनगर येथील रहिवासी त्रस्त झालेले आहेत. पालिकेच्या पथ विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सध्या किमान चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरून खड्डे बुजवून घेणे आवश्यक आहे. तसेच पाऊस थांबल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी सिमेंट कॉंक्रीटीकरण करुन घेतल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची वाट न पाहता पालिकेने तातडीने आवश्यक कार्यवाही करणे गरजेचे आहे.








