
धायरी फाटा परिसरातील वाहतूक समस्येबाबत तातडीने उपाययोजना करा;राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पालिका व पोलीस प्रशासनाला सूचना
धायरी फाटा परिसरातील वाहतूक समस्येबाबत तातडीने उपाययोजना करा;राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पालिका व पोलीस प्रशासनाला सूचना
पुणे: सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे दररोज सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत उपाययोजना करण्यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या आहेत. आज सकाळी चाकणकर यांनी धायरी फाटा येथे अधिकाऱ्यांसह पाहणी करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यानूसार उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय वाघमोडे, सिंहगड रोड वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सुनील गवळी व इतर अधिकारी उपस्थित होते.
धायरी फाटा येथे सकाळ संध्याकाळ प्रयेजा सिटीकडून येणाऱ्या वाहनांचा लोंढा, अस्ताव्यस्त उभी असलेली वाहने, मनमानी करत चौकात उभे राहणारे रिक्षाचालक, नियम मोडून विरुद्ध दिशेने येणारी वाहने यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याचा फटका दररोज कामावर जाणारे नागरिक, विद्यार्थी यांना सहन करावा लागतो. प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस ही समस्या अधिक गंभीर होत चालली आहे.
वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत नागरिक तीव्र संताप व्यक्त करत असल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच कोणतीही कारणे न देता ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.









