
खरेदी ‘गुंठ्यांमध्ये’आणि ताबा ‘एकरांमध्ये’; खडकवासला पाटबंधारे विभागाच्या जागेवर पाण्यात भराव टाकून मोठे अतिक्रमण; आगळंबे गावच्या हद्दीतील अतिक्रमण कारवाईकडे सर्वांचे लक्ष
खरेदी ‘गुंठ्यांमध्ये’आणि ताबा ‘एकरांमध्ये’; खडकवासला पाटबंधारे विभागाच्या जागेवर पाण्यात भराव टाकून मोठे अतिक्रमण; आगळंबे गावच्या हद्दीतील अतिक्रमण कारवाईकडे सर्वांचे लक्ष
पुणे: सातबारा उताऱ्यावर अठरा गुंठे जागा असताना प्रत्यक्षात मात्र तब्बल दोन ते तीन एकर जागेवर ताबा मारुन अलिशान फार्महाऊस उभारले असून इतके दिवस डोळे मिटून ‘खिशात हात घालून बसलेला’ पाटबंधारे विभाग आता या फार्महाऊसवर कारवाई करणार आहे. इतर ठिकाणी धडाधड तोडकाम करण्यात आले असले तरी या फार्महाऊसवर कारवाई करताना संबंधितांची धडधड वाढली आहे. त्यामुळे येथे खरंच कारवाई होणार की कारवाईसाठी आणलेले जेसीबी ACB च्या ताकदीपुढे नांगी टाकून परतणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मागील काही दिवसांपासून पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून खडकवासला धरणाच्या दोन्ही बाजूंना करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरू आहे. अनेक ठिकाणी कारवाई करत पाण्यालगत बांधलेल्या भिंती, शेड, लॉन तोडण्यात आले आहे. एवढंच नाही तर अतिक्रमण म्हणून काही धार्मिक स्थळांवरही कारवाई करुन ते पूर्णपणे भुईसपाट करण्यात आले आहेत. पुणे मनपाची यंत्रणा आणि मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन पाटबंधारे विभागाने ही धडक कारवाई सुरू केली आहे या कारवाईला काहींचा विरोध तर बहुतांश नागरिक स्वागत करत आहेत.
आगळंबे गावच्या हद्दीत एका अधिकाऱ्याने बेनामी पद्धतीने केवळ अठरा गुंठे जागा खरेदी करुन तब्बल दोन ते तीन एकर जागेवर ताबा मारुन अलिशान फार्महाऊस उभारले आहे. राजरोसपणे थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात भराव टाकण्यात आलेला आहे. हा अधिकारी त्याच्या पदाचा वापर करुन आतापर्यंत सर्वकाही मॅनेज करत आलेला आहे. त्यामुळे आताची कारवाईही मॅनेज होणार की इतर ठिकाणी झाली तशी बेधडक तोडक कारवाई होणार हे पुढील एक दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.
सखोल चौकशी होणे गरजेचे
आगळंबे गावच्या हद्दीतील या आलिशान फार्महाऊसच्या ‘खऱ्या मालकाने’ सर्वसामान्य शेतकऱ्यांना अत्यंत त्रास दिलेला आहे. सर्व यंत्रणांना हाताशी धरून मनमानी केली जात आहे. याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. केवळ अठरा गुंठे खरेदी असताना इतका मोठा डोलारा कसा उभा राहिला?कोणता पैसा येथे लावण्यात आला आहे? कोणत्या विभागाने परवाणगी दिली आहे? ग्रामपंचायतीच्या दप्तरी किती बांधकामाची नोंद आहे? याबाबत सर्व संबंधित विभागांनी चौकशी करणे आवश्यक आहे.
द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस करणार मालिका!
या अतिक्रमण कारवाईतून समोर येणाऱ्या सर्व बऱ्या वाईट गोष्टी आणि त्यामागील दडलेल्या गुपितांची मालिका द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस करणार आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राजरोसपणे सुरू असलेल्या अतिक्रमणांवर द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेसने यापूर्वीही निर्भिडपणे आवाज उठविलेला आहे. यापुढेही कागदपत्रे, तथ्य आणि ग्राउंड रिपोर्टींगच्या माध्यमातून द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस सर्व गोष्टींना वाचा फोडणार आहे.








