
अखेर खडकवासला धरणाला लागून असलेल्या ‘त्या’ गावठी दारू भट्टीवर वेल्हे पोलीसांची धडक कारवाई; हातभट्टीच्या साहित्याची केली होळी;एकावर गुन्हा दाखल
अखेर खडकवासला धरणाला लागून असलेल्या ‘त्या’ गावठी दारू भट्टीवर वेल्हे पोलीसांची धडक कारवाई; हातभट्टीच्या साहित्याची केली होळी;एकावर गुन्हा दाखल
पुणे: खडकवासला धरणालगत ओसाडे (ता. वेल्हे/राजगड) गावच्या हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या गावठी दारू भट्टीवर अखेर वेल्हे पोलीसांनी धडक कारवाई करत भट्टी उध्वस्त केली आहे. कच्चे रसायन नष्ट करण्यात आले व साहित्याची होळी करण्यात आली. याप्रकरणी बच्चन मेरु नानवत (वय 35, रा. ओसाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही मोठी धडक कारवाई केली आहे.
ओसाडे येथे मूनवेक हॉटेल च्या मागच्या बाजूला खडकवासला धरणाच्या पाण्यालगत गावठी दारूची भट्टी सुरू होती. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने याबाबत सातत्याने पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधून कारवाई करण्याची मागणी केली होती. यापुर्वीही याच ठिकाणी तब्बल आठ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले होते. त्यामुळे सदर भट्टी चालक कायद्याला आणि पोलीसांना जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. वेल्हे पोलीसांच्या पथकाने आता पुन्हा कारवाई करत मुद्देमाल नष्ट केला आहे.
ही भट्टी लाखो पुणेकर पाणी पित असलेल्या खडकवासला धरणालगत असल्याने आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. या भट्टीची घाण, रसायने थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात मिसळत असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे वेल्हे पोलीसांनी संबंधित सर्व बाबींचा विचार करून त्याप्रमाणे कलमांमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. पोलीस शिपाई युवराज सोमवंशी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंकज मोघे अधिक तपास करत आहेत.
पाटबंधारे विभाग काय करतोय?
मागील काही वर्षांपासून या ठिकाणी गावठी दारू भट्टी राजरोसपणे सुरू आहे. पाटबंधारे विभागाचे खडकवासला धरण शाखेतील अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती नाही का? माहिती नसेल तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राजरोसपणे गावठी दारू भट्टी सुरू असताना पाटबंधारे विभाग गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उत्पादन शुल्क विभागाग हप्त्यात व्यस्त?
महत्वाचे म्हणजे गावठी दारू भट्टीवर कारवाई करण्याचे काम मुख्यतः राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आहे. मात्र उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी ‘हप्त्या दोन हप्त्याने’ कधीतरी फिरकतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दाखविण्यासाठी ‘सेटलमेंट’ कारवाया केल्या जातात. याबाबत राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्तांचेही लक्ष वेधून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी करतात काय ?
गावठी दारू विक्री, गावठी दारू भट्टी, गांजा विक्री वगैरे अवैध धंदे हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पुजारी यांच्या कार्यालयापासून जवळपास सुरू असताना ते नेमके करतात काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हवेली उपविभागीय अधिकारी सुनील पुजारी यांनी हवेली,पौड व वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचे आढळले नाही. हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पुजारी यांनी पदाची लाज राखण्यासाठी काहीतरी कारवाई करुन दाखविणे गरजेचे आहे.








