
पालिकेविरोधात नांदोशीच्या ग्रामस्थांचे आंदोलन सुरू; रस्ता नाही तर केवळ कचरा पाण्यासाठी टॅक्स भरायचा का? म्हणत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लावले हाकलून; काकड आरतीचे रुपांतर आंदोलनात!
पालिकेविरोधात नांदोशीच्या ग्रामस्थांचे आंदोलन सुरू; रस्ता नाही तर केवळ कचरा पाण्यासाठी टॅक्स भरायचा का? म्हणत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लावले हाकलून; काकड आरतीचे रुपांतर आंदोलनात!
नांदोशी: वारंवार मागणी, तक्रारी करुनही पालिकेकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नसल्याने सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या नांदोशी ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. रस्ता देता येत नाही तर फक्त कचरा आणि पाण्यासाठी टॅक्स भरायचा का? असे म्हणत स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाकलून लावले आहे.
नांदोशी येथील मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे व त्यात पाणी साचलेले असल्याने ये जा करणे अवघड झाले आहे. दररोज अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या, सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाज उठवला परंतु पालिकेकडून दखल घेतली जात नाही असा आरोप करत नागरिक आक्रमक झाले आहेत.
कालपासून नागरिकांनी आंदोलनाची तयारी सुरू केली होती. आज सकाळी सर्व महिला, पुरुष, लहान मुले काकड आरतीसाठी विठ्ठल मंदिरात जन्मल्यानंतर सगळ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. रस्ता नाही तर पालिकेचे काहीच नको म्हणत गावातील आरोग्य कोठी उघडू दिली नाही. स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना संतप्त नागरिकांनी हाकलून लावले. पालिकेकडून जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे.
“अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु कोणी लक्ष देत नाही. रस्ता अत्यंत खराब झाला असून दररोज अपघात होत आहेत. केवळ कचरा आणि पाण्यासाठी आम्ही टॅक्स भरायचा का?” राहुल घुले, ग्रामस्थ नांदोशी.









