
नांदोशी येथील मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था; सातत्याने अपघात,पायी चालणे कठीण;पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक संतप्त
नांदोशी येथील मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था; सातत्याने अपघात,पायी चालणे कठीण;पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक संतप्त
पुणे: नांदोशी येथील मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे आणि त्यात पाणी साचलेले असल्याने सातत्याने अपघात होत आहेत. या रस्त्यावरुन पायी चालणे अशक्य झाले असून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांचे हाल होत आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
जलवाहिनी टाकण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून काही महिन्यांपूर्वी खोदकाम करण्यात आले होते त्यावेळी निघलेली माती तशीच रस्त्यावर पडून आहे.सतत पाऊस सुरू असल्याने या मातीचा चिखल झाला असून पायी चालणे कठीण झाले आहे. अवजड वाहतुकीमुळे खड्डयांचा आकार दिवसेंदिवस मोठा होत असल्याने दुचाकी,तीनचाकी वाहनांचा अपघात होत आहे.
पालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाचे नांदोशी येथील रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री अजित पवार यांचा दौरा होता तेव्हा सिंहगड रस्त्यावरील खड्डे रातोरात बुजवून डागडुजी करण्यात आली होती. मग नांदोशी येथील खड्डे का बुजविता येत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पथ विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.









