
Pune Police: नांदेड सिटी पोलीस स्टेशन अंतर्गत किरकटवाडी पोलीस चौकी बांधून तयार पण कामकाज कधी सुरू होणार? गुन्हेगारी घटना वाढत असल्याने नागरिकांचा संतप्त सवाल
Pune Police: नांदेड सिटी पोलीस स्टेशन अंतर्गत किरकटवाडी पोलीस चौकी बांधून तयार पण कामकाज कधी सुरू होणार? गुन्हेगारी घटना वाढत असल्याने नागरिकांचा संतप्त सवाल
किरकटवाडी: पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील नांदेड सिटी पोलीस स्टेशन अंतर्गत किरकटवाडी फाट्याजवळ पोलीस चौकीचे बांधकाम पूर्ण होऊन दोन महिने उलटून गेले तरीही अद्याप कामकाज सुरू झालेले नाही. किरकटवाडी, खडकवासला भागात सातत्याने गुन्हेगारी घटना घडत असल्याने पोलीस चौकी सुरू कधी होणार? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
किरकटवाडी, खडकवासला,नांदोशी- सणसनगर या गावांचा पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत समावेश होऊन वर्ष उलटून गेले आहे. नांदेड सिटी येथे नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्यात आले असून कायदा सुव्यवस्था व वेळेवर पोलीस मदत उपलब्ध व्हावी म्हणून पोलिस स्टेशन अंतर्गत त्या त्या भागांच्या मध्यवर्ती ठिकाणी पोलीस चौक्या करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार किरकटवाडी, खडकवासला,नांदोशी सणसनगर या गावांसाठी किरकटवाडी फाट्याजवळ पोलीस चौकी बांधण्यात आलेली आहे.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी या पोलीस चौकीचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या ही खोली धुळखात पडून आहे. सातत्याने गुन्हेगारी घटना घडत असताना पोलीस चौकी सुरू करण्यास का विलंब होत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या सेवेसाठी लवकरात लवकर पोलीस चौकी सुरू करणे आवश्यक आहे.








