
Disaster Management:पालिका आयुक्त नवल किशोर राम यांची एकता नगरला भेट; पूरग्रस्त भागाची पाहणी करुन प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा घेतला आढावा; पालिकेच्या कामाबाबत नागरिकांनी व्यक्त केले समाधान
Disaster Management:पालिका आयुक्त नवल किशोर राम यांची एकता नगरला भेट; पूरग्रस्त भागाची पाहणी करुन प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा घेतला आढावा; पालिकेच्या कामाबाबत नागरिकांनी व्यक्त केले समाधान
पुणे: पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी रात्री उशिरा अचानक मुठा नदीपालगत असलेल्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगर परिसरात पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी पुणे शहर आपत्ती व्यवस्थापन प्रभारी तथा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 35 हजार क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने एकता नगर परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. काही इमारतींचा पार्कींगचा भाग पाण्याखाली गेला असून अतिधोकादायक ठिकाणच्या रहिवाशांना पालिकेने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. सध्या या ठिकाणी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले असून पुणे शहर पोलीसांचा बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे.
मागील वर्षी अचानक मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्याने एकता नगर भागात पाणी शिरले होते. अनेक घरांमध्ये पाणी शिरुन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावर्षी तसा प्रसंग पुन्हा उद्भवू नये म्हणून सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. नदीच्या कडेने मातीचा भराव टाकण्यात आल्याने त्याचा सध्या फायदा होताना दिसत आहे. पुराच्या पाण्यात कोणी जाऊ नये म्हणून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. या सर्व कामांची पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाहणी केली व स्थानिक रहिवाशांशी संवाद साधत धीर दिला. यावेळी नागरिकांनी देखील पालिकेच्या कामाचे कौतुक करत आयुक्तांचे आभार मानले.
तशी घटना घडणार नाही
मागील वर्षी पाटबंधारे विभागाने चुकीची माहिती सांगून प्रत्यक्षात मात्र दुपटीने जास्त विसर्ग सोडल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. ही बाब द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तशी घटना यावर्षी घडणार नाही अशी हमी आयुक्तांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांशिवाय पाटबंधारे विभागाकडून पाण्याचा विसर्ग वाढविला जाणार नाही तशा सूचना देण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.









