
प्रभागरचना जाहीर….. भावी नगरसेवकांच्या समाजसेवेला फुटू लागले धुमारे!
प्रभागरचना जाहीर….. भावी नगरसेवकांच्या समाजसेवेला फुटू लागले धुमारे!
पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा न्यायालयातील अडथळा दूर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुकांचे लक्ष लागले होते ते प्रभागरचना कधी जाहिर होणार? प्रभाग कसा असणार? पोषक असणार की प्रतिकूल? याकडे. अखेर काल ही प्रतिक्षा संपली. पुणे मनपाची बहुप्रतिक्षित प्रभागरचना जाहीर झाली आणि ‘Dormant stage'(निद्रीस्त अवस्था) मध्ये असलेल्या इच्छुकांच्या समाजसेवेला पुन्हा धुमारे फुटण्यास सुरुवात झाली आहे!
इच्छुकांनी आपापल्या प्रभागाची तांत्रिक पडताळणी करण्यास सुरुवात केली असून आगाऊ अंदाज बांधले जात आहेत. अर्थात अजून ही प्रभागरचना अंतिम झालेली नसून सूचना व हरकती मागविण्यात आलेल्या आहेत. असे असले तरी सत्ताधारी पक्षाला पोषक असलेली प्रभागरचना सहजासहजी बदलेल अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे हीच प्रभागरचना अंतिम समजून ‘सोशल’ मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. युती,आघाडी की स्वबळावर लढायचं या चर्चा राजकीय पक्षांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहेत. इच्छुक मात्र काही झालं तरी लढायचंच यावर ठाम असल्याचे दाखवत आहेत!
आपण केलेल्या कामांची लांबलचक यादी कशी होईल, केवळ आपणच लोकांसाठी काम करतोय हे कसे दिसेल, आपणच एकमेव दावेदार कसे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. राजकीय महत्त्वाकांक्षेला समाजसेवेची झालर लावून स्वतःला introduce करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर निवडणूक होत असल्याने सर्व इच्छुकांनी आपापल्या परीने तयारी सुरू केली आहे. कोणाच्या समाजसेवेचा प्रवास नगरसेवकापर्यंत जाऊन थांबतोय ते लवकरच स्पष्ट होणार आहे.









