
त्या आधार केंद्राचा परवाना रद्द होणार का? आधार नोंदणीसाठी विशेष शिबीराचे आयोजन पण आधार नोंदणीचे मशिनच उपलब्ध नाही; आरोग्य अधिकाऱ्यांनीही फिरवली पाठ; कोंढवेधावडे येथील प्रकार
त्या आधार केंद्राचा परवाना रद्द होणार का? आधार नोंदणीसाठी विशेष शिबीराचे आयोजन पण आधार नोंदणीचे मशिनच उपलब्ध नाही; आरोग्य अधिकाऱ्यांनीही फिरवली पाठ; कोंढवेधावडे येथील प्रकार
पुणे: पश्चिम हवेली तालुक्यातील आदिवासी कातकरी नागरिकांची वर्षानुवर्षे सुरू असलेली हेळसांड अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाही. आज कोंढवेधावडे येथील मनपा शाळेच्या हॉलमध्ये आदिवासी कातकरी नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबीरासाठी पूर्वकल्पना देऊन तसेच हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांचा आदेश असताना वारजे येथील आधार केंद्र चालक व सांगरुन प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी यांनी पाठ फिरवली. त्यामुळे बेजबाबदार आधार केंद्राचा परवाना रद्द करण्यात यावा तसेच आरोग्य अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
आदिवासी कातकरी नागरिकांना आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचे दाखले आदी शासकीय कागदपत्रे मिळत नसल्याने 15 ऑगस्ट पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार होते. त्याची दखल घेऊन हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांनी 14 ऑगस्ट रोजी हवेली तहसील कार्यालयात बैठक घेतली व 19 ऑगस्ट पासून आदिवासी कातकरी वस्ती असलेल्या भागात कागदपत्रे देण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्याचे लेखी पत्र देऊन आंदोलन न करण्याची विनंती केली होती.
त्यानुसार आज न्यु कोपरे, ते बहुली पर्यंतच्या गावांतील आदिवासी कातकरी नागरिकांसाठी कोंढवे धावडे महसुली मंडळांतर्गत कोंढवे धावडे येथील मनपा शाळेच्या हॉलमध्ये शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीरासाठी आदिवासी विकास विभाग घोडेगाव येथील निरिक्षक प्रणय संखे, मंडळ अधिकारी भारत रुपनवर, संबंधित गावांतील कामगार तलाठी व पन्नास ते साठ आदिवासी कातकरी महिला, पुरुष व लहान मुले उपस्थित होते. मुसळधार पाऊस सुरू असताना कागदपत्रे मिळण्याच्या आशेने आदिवासी नागरिक आले होते. मात्र ज्याचे मुख्य काम आहे तो आधार केंद्र चालक मशिन घेऊन आलाच नाही. अक्षरशः मंडळ अधिकाऱ्यांचे फोनही तो उचलत नव्हता. सांगरुण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांनीही या शिबीराकडे पाठ फिरवली. परिणामी आधार संबंधी कोणतेही काम न होता आदिवासी कातकरी नागरिकांना भर पावसात हताश होऊन परत जावे लागले.
परवाना रद्द व्हावा
याबाबत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांच्याशी संपर्क साधून अशा बेजबाबदार आधार केंद्र चालकाचा परवाना तातडीने रद्द करण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार प्रणालीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत कळविल्याचे सांगितले. तसेच इतर ठिकाणचे मशिन उपलब्ध करून देऊन आदिवासी कातकरी नागरिकांची नोंदणी पूर्ण करुन घेण्यात येईल असे सांगितले.








