
एनडीएतील जवानांसोबत रक्षाबंधन, सीमेवरील जवानांनाही पाठवल्या राख्या; खडकवासला येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयाचा अनोखा उपक्रम
एनडीएतील जवानांसोबत रक्षाबंधन, सीमेवरील जवानांनाही पाठवल्या राख्या; खडकवासला येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयाचा अनोखा उपक्रम
खडकवासला: येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयातील विद्यार्थीनींनी एनडीएतील जवानांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून कल्पकतेने तयार केलेल्या राख्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठीही पाठवून दिल्या. विद्यार्थ्यांनींनी औक्षण करत राख्या बांधल्यानंतर जवानही भारावून गेले होते. देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा करणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
दिपक पाटील , सत्य प्रकाश, अनिल , ए एस अरगडे,मनीष कुमार, गणेश पगारे, धयगोधना आदी अधिकाऱ्यांना विद्यार्थिनींनी राखी बांधली व इतर सैनिकांसाठी राख्या सुपूर्द केल्या.यावेळी शाळेच्या वतीने डी डी कापरे सर उपस्थित होते.
शाळेच्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतल्याने, यशवंत विद्यालयात देशभक्तीने भारावलेले वातावरण निर्माण झाले होते. या वेळी आयोजित कार्यक्रमात राख्यांचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध रंगी-बेरंगी, सृजनशील राख्यांचे कौतुक सर्व उपस्थित पालक व शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन गुरुकुल प्रमुख वैशाली येवले यांनी तर आभार प्रदर्शन शीतल चवरे यांनी केले. यावेळी विभागप्रमुख ज्योती कपाळे, ज्येष्ठ शिक्षक जीवंधर हरोले आदी उपस्थित होते.
“आपण जरी सीमेवर नसलो तरी आपल्या प्रेमाच्या राख्या मात्र सैनिकांपर्यंत पोहोचू शकतात, त्यांच्या देशसेवेबद्दल आपण त्यांचे सदैव ऋणी असणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. म्हणून आपण स्वहस्ते निर्मित केलेल्या राख्या आपल्या या बांधवांना पाठवत आहोत. शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.” नंदकुमार फडतरे, मुख्याध्यापक, यशवंत विद्यालय, खडकवासला.









