
Crime News: सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी स्थानबद्ध; नांदेड सिटी पोलीसांची MPDA अंतर्गत पाचवी कारवाई
Crime News: सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी स्थानबद्ध; नांदेड सिटी पोलीसांची MPDA अंतर्गत पाचवी कारवाई
धायरी: येथील सराईत गुन्हेगार साईनाथ शिवाजी उभे (वय 23 वर्ष राहणार फ्लॅट नंबर 401 शिवालय पार्क जाधव नगर रायकर मळा धायरी) यास वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केला आहे. नांदेड सिटी पोलीसांनी तयार केलेल्या प्रस्तावानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नांदेड सिटी पोलीसांनी आतापर्यंत पाच सराईत गुन्हेगारांवर MPDA कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
साईनाथ उभे याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाया करुनही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच होत्या. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, झोन तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अजय परमार यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुन्हे गुरुदत्त मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस अंमलदार प्रथमेश गुरव, कैलास केंद्रे, अनिल बारड यांनी स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता.
सदर प्रस्तावास आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर पोलीस अंमलदार भिमराज गांगुर्डे व निलेश खांबे यांनी गोपनीय माहिती काढून साईनाथ उभे यास ताब्यात घेतले. त्यास पुढील वर्षभरासाठी बुलढाणा येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. हद्दीतील गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर अशाप्रकारे कठोर कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली आहे.








