
तुला आता मारुनच टाकतो म्हणत वरदाडे येथे जुन्या भांडणाचा राग धरुन सहा जणांकडून दोघांना हातात शस्त्रे घेऊन जबर मारहाण; हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल; आरोपी फरार
तुला आता मारुनच टाकतो म्हणत वरदाडे येथे जुन्या भांडणाचा राग धरुन सहा जणांकडून दोघांना हातात शस्त्रे घेऊन जबर मारहाण; हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल; आरोपी फरार
पुणे: दोन वर्षांपूर्वी दिवाळीत फटाके वाजविण्यच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरून वरदाडे (ता. हवेली) येथे सहा जनांनी मयूर शेडे व त्यांच्या वहिनींना कोयता, लोखंडी रॉड, फावड्याचा दांडा आदी शस्त्रांनी घरात घुसून जबर मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी दोन अल्पवयीन तरुणांसह एकूण सहा आरोपींवर हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष श्रीपती लोहकरे (वय 40 ), श्रीपती मारुती लोहकरे (वय 65), अथर्व काळुराम लोहकरे (वय 20), नरेश श्रीपती लोहकरे (वय 45) व दोन अल्पवयीन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार नोकरी करत असलेले मयुर शेडे हे 28 जुलै रोजी सायंकाळी कामावरून घरी जात असताना खानापूर येथे भाजी घेण्यासाठी थांबले होते. तेथे लोहकरे यांच्या घरातील एक अल्पवयीन तरुण मयुर यांच्याकडे रागाने पाहत होता. त्यावेळी मयूर यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर सहा आरोपी हातात शस्त्रे घेऊन मयुर शेडे यांच्या घरात शिरले व बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात मयूर शेडे यांच्या डोक्याला, पाठीवर,हातावर,पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. भांडणाचा आवाज ऐकून मयूर यांची वहिणी वाचविण्यासाठी मधे आली असता तिलाही मारहाण करुन कपडे फाडण्यात आले.
याबाबत हवेली पोलीस स्टेशनमध्ये मयूर शेडे यांच्या फिर्यादीवरून सहा आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या मोकाट असून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी मयुर शेडे यांनी केली आहे.








