
Ring Road Work: रिंग रोडच्या कामासाठी चढाओढ! खडकवासला धरणाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर धावताहेत विना नंबरचे ‘यमदूत’; वाहतूक पोलीस आणि RTO प्रशासनाचे दुर्लक्ष
Ring Road Work: रिंग रोडच्या कामासाठी चढाओढ! खडकवासला धरणाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर धावताहेत विना नंबरचे ‘यमदूत’; वाहतूक पोलीस आणि RTO प्रशासनाचे दुर्लक्ष
पुणे: रिंग रोडचे काम सध्या वेगात सुरू असल्याने तेथे मटेरियल पुरविण्यासाठी ठेकेदारांची अक्षरशः चढाओढ सुरू आहे. शेकडो अवजड डंपर पुणे-पानशेत रस्ता आणि एनडीए बहुली रस्ता अशा खडकवासला धरणाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या मुख्य रस्त्यांवरुन ये-जा करताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे यातील बहुतांश डंपरच्या नंबरप्लेट काढून ठेवण्यात आलेल्या असून या ‘यमदूतांकडे’ वाहतूक पोलीस आणि RTO प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.
खानापूर-पाबे रस्त्यावर मते गेट परिसरात डंपरचा अपघात झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रिंग रोडच्या कामासाठी दिवसरात्र अवजड डंपरची वर्दळ सुरू आहे मात्र अरुंद रस्त्यांमुळे इतर वाहतुकीवर त्याचा परिणाम होत असून सातत्याने लहानमोठे अपघात होत आहेत. या डंपरवरील बहुतांश चालकांकडे कागदपत्रे नाहीत, मद्यधुंद अवस्थेत असतात, सातत्याने फोनवर बोलत असतात त्यामुळे इतरांसाठी हे ‘यमदूत’ बनून रस्त्यावर धावत आहेत.
ज्या भागातून हे डंपर धावत आहेत तो भाग नांदेड सिटी, हवेली, वेल्हे, उत्तमनगर अशा चार पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे. संबंधित हद्दीतील वाहतूक पोलीस व RTO प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ‘दर महिन्याच्या 10 तारखेला’ या भागात फिरणाऱ्या RTO अधिकाऱ्यांनी इतरही दिवस येण्याची आवश्यकता आहे. अशाप्रकारे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या अवजड वाहतूकीवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.








