
खडकवासला येथे लंपी’मुळे बैलाचा मृत्यू; मोठ्या प्रमाणात पसरलेल्या साथीमुळे पशुधन धोक्यात; तातडीने व्यापक लसिकरण मोहिम राबविण्याची आवश्यकता
खडकवासला येथे लंपी’मुळे बैलाचा मृत्यू; मोठ्या प्रमाणात पसरलेल्या साथीमुळे पशुधन धोक्यात; तातडीने व्यापक लसिकरण मोहिम राबविण्याची आवश्यकता
पुणे: खडकवासला परिसरात मोठ्या प्रमाणात लंपी’आजाराची लागण झाल्याने पशुधन धोक्यात आले आहे तर दुसऱ्या बाजूला विधान भवनात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक भूमिका घेण्याऐवजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मीसर्कल ही ऑनलाईन गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सरकारच्या असंवेदनशीलतेबाबत शेतकरी, नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
खडकवासला येथील शेतकरी तानाजी रघुनाथ मते यांच्या बैलाला काही दिवसांपूर्वी लंपी आजाराची लागण झाली होती. औषधोपचारांसाठी हजारो रुपये खर्च करुनही ते बैलाला वाचवू शकले नाहीत. परिणामी त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान तर झालेच आहे शिवाय चालू कामाचा खोळंबा झाल्याने त्यांच्यासमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.
सध्या पश्चिम हवेलीतील गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात लंपी आजाराची साथ पसरलेली आहे. दुभती जनावरे, बैल व गावरान गोवंशावर या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आजार पसरलेला असताना शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून आवश्यक खबरदारी घेतलेली दिसून येत नाही. लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना खाजगी डॉक्टरांकडून लसीकरण करुन घ्यावे लागत असून त्याचे दर जास्त असल्याने नाहक खर्च करावा लागत आहे. याबाबत दखल घेऊन प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी, दुग्ध व्यावसायिक यांच्याकडून करण्यात येत आहे.









