
गे डेटींग ॲप द्वारे मैत्रीचा बहाणा करुन तरुणाला ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक; नांदेड सिटी पोलीसांची कारवाई
गे डेटींग ॲप द्वारे मैत्रीचा बहाणा करुन तरुणाला ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक; नांदेड सिटी पोलीसांची कारवाई
पुणे: गे डेटींग (टींडर) ॲप वरुन तरुणाशी मैत्रीचा बहाणा करून त्यानंतर त्याचे अश्लील व्हिडिओ काढून ते नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत साथीदाराच्या मदतीने जबरदस्तीने ऑनलाईन दहा हजार रुपये ट्रान्स्फर करुन घेऊन फसवणूक करणाऱ्याला नांदेड सिटी पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. रॉबीन उर्फ शुभम उपेंद्र कांबळे (वय 27, रा. नांदेड फाटा, सिंहगड रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार ओंकार मंडलिक याचा नांदेड सिटी पोलीस शोध घेत आहेत.
फिर्यादी आणि आरोपी यांची गे डेटींग ॲप वरुन ओळख झाली होती. आरोपीने तरुणाला नांदेड सिटी गेटसमोर भेटण्यासाठी बोलवून घेऊन चारचाकी गाडीत बसवून प्रयेजा सिटी जवळील मोकळ्या मैदानात नेऊन तरुणासोबत अश्लिल कृत्य करण्यास सुरुवात केली. तरुणाने विरोध केल्यानंतर जबरदस्तीने त्याचे कपडे काढून व्हिडिओ काढला व तो नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. आरोपीने साथीदार ओंकार मंडलिक याच्या मदतीने तरुणाच्या मोबाईल वरुन 10 हजार रुपये जबरदस्तीने ऑनलाईन ट्रान्स्फर करुन घेतले.
घाबरलेल्या तरुणाने याबाबत नांदेड सिटी पोलीसांना माहिती दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस कॉन्स्टेबल प्रतिक मोरे व स्वप्नील मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीस अटक करण्यात आले असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार,सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त,सिंहगड रोड विभाग अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुन्हे गुरुदत्त मोरे, तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील मगर, प्रतिक मोरे, पोलीस हवालदार संग्राम शिनगारे, पोलीस नाईक राजु वेगरे, शिवाजी क्षिरसागर, मोहन मिसाळ, अक्षय जाधव, निलेश कुलथे,उत्तम शिंदे, निलेश खांबे,गांगुर्डे, सतिश खोत, विशाल तांबे यांनी केली आहे.








