
Scam Open: द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’चा पाठपुरावा, नांदेड सिटी पोलीसांकडून दखल आणि फिल्मी स्टाईलने सुरू असलेले रॅकेट उघड; चक्क 112 ला फोन करुन ठगांकडून घेतली जात होती पोलीस मदत; अखेर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल
Scam Open: द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’चा पाठपुरावा, नांदेड सिटी पोलीसांकडून दखल आणि फिल्मी स्टाईलने सुरू असलेले रॅकेट उघड; चक्क 112 ला फोन करुन ठगांकडून घेतली जात होती पोलीस मदत; अखेर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे: नांदेड सिटी येथे राहत असलेल्या आणि आयटी कंपनीत कामाला असलेल्या रहिवाशाच्या घरापर्यंत पाठलाग करत अज्ञात दोघेजण येतात आणि 20 हजार रुपये तुम्ही कॅश घेतले ते ऑनलाईन देणार म्हटले आणि न देताच आले म्हणत 20 हजार रुपये द्या नाही तर गुन्हा दाखल करु म्हणत अरेरावी करतात. ते इतक्यावर थांबत नाहीत तर 112 नंबरवर फोन करून पोलीस मदत घेतात. पोलीस सोसायटीत येतात आणि वस्तुस्थिती समजून न घेता रहिवाशांनाच दमदाटी करतात. आलेले पोलीस मार्शल रहिवासी आणि त्या दोघांना घेऊन नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये येतात.
नांदेड सिटी येथील रहिवासी आणि किरकटवाडी येथील त्यांचे नातेवाईक अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळून जातात. ज्यांना कधी पाहिलेले नाही ते 20 हजार रुपये कॅश दिली म्हणत आहेत आणि पोलीस कर्मचारी ऐकून घेत नाहीत म्हटल्याने ते अधीकच घाबरून गेले. किरकटवाडी येथील रहिवाशाने रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’शी फोनवरून संपर्क साधला आणि घडत असलेला प्रसंग सांगून मदतीसाठी येण्याची विनंती केली. त्यानुसार पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर याबाबत लगेच शहानिशा करण्याची मागणी केली परंतु पोलीस कर्मचाऱ्याने त्या दोघांना काढून देण्याची घाई केली.
द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने हा प्रकार गांभीर्याने घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. नागरिकांना लुटण्यासाठी ठगांनी हा नवीन फंडा शोधला असून याचा पर्दाफाश करण्याची मागणी लावून धरली. धक्कादायक म्हणजे 112 ला फोन करुन या लुटीत पोलीसांची दिशाभूल करुन मदत घेतली जात असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानुसार नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव यांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यानुसार अखेर आयुष राजु चौगुले (वय 22, रा. आदर्श कॉलनी, दत्तमंदिर रोड, वाकड पोलीस स्टेशन समोर, वाकड पुणे.) आणि सदफ पठाण (वय 21) या दोघांवर नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस गाफील का?
आरोपींचा अवतार, त्यांच्या बोलण्यात असलेली तफावत, तब्बल वीस किलोमीटर पाठलाग करत घरापर्यंत येणे, रहिवासी एका ठिकाणी तब्बल एक तास जेवणासाठी थांबलेले असताना त्यावेळी बाहेर उभं राहून लक्ष ठेवणे वगैरे अनेक गोष्टी आरोपींचा हा बनाव असल्याचे सहज लक्षात येण्यास पुरेशा होत्या. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने त्याच वेळी हे रॅकेट असल्याचे स्पष्ट व सडेतोडपणे पोलीसांना सांगितले होते. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांना अशी शंका आली नाही. कर्मचारी दखल घेत नसल्याने नाईट इन्चार्ज असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव यांना हा प्रकार सांगितला तेव्हा त्यांनी सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले होते. इतर पोलीस मात्र गाफील असल्याचे दिसत होते.
नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज
सराईत भामट्यांकडून नागरिकांना फसविण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. पोलीस कारवाईची भीती घातली जात आहे. अशावेळी नागरिकांनी अतिशय सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. आपली चूक नसेल तर घाबरण्याची गरज नाही. तसेच घाबरून ठगांना बळी न पडता त्या विरोधात उभं राहायला हवं.
द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ खंबीरपणे देईल साथ!
नांदेड सिटी येथील रहिवासी व किरकटवाडी येथील त्यांचे नातेवाईक यांनी प्रसंगावधान राखून द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’शी संपर्क साधल्याने हे रॅकेट उघडकीस आले आहे. या ठगांनी आणखी कोणाला फसविले असेल तर त्यांनी नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे जाऊन माहिती द्यावी. तसेच चूक नसताना अन्याय, अत्याचार होत असेल तर द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’शी संपर्क साधावा. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ अशा प्रकरणांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करेल.








