
40 लाख रुपये रोकड असलेली बॅग मित्राकडे ठेवायला दिली अन् थार गाडीतून आलेल्या तिघांनी पळवली!…. पण त्याच थार मुळे पोलीसांनी आवळल्या मुसक्या!
40 लाख रुपये रोकड असलेली बॅग मित्राकडे ठेवायला दिली अन् थार गाडीतून आलेल्या तिघांनी पळवली!…. पण त्याच थार मुळे पोलीसांनी आवळल्या मुसक्या!
पुणे: नवले पूल ते कात्रज रस्त्यावर बाबजी पेट्रोल पंपासमोर थार गाडीतून आलेल्या तिघांनी व्यावसायिकाकडून 40 लाख रुपये रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला मात्र आंबेगाव पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रदीप रामदास डोईफोडे (रा. फ्लॅट नं 111, वरद हाईट्स, इंगळेनगर, भुगाव,पुणे) व मंगेश दिलीप ढोणे ( रा. रामलिंगनगर, येडशी, जि. धाराशिव) व एक विधीसंघर्षीत बालक अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.महत्वाचे म्हणजे ज्या थार गाडीचा चोरीसाठी वापर केला त्याच थारमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
धाराशिव येथील अभिजित विष्णु पवार यांचा येडशी येथे श्री गणेश ट्रेडर्स ॲन्ड पत्रा डेपो या नावाने व्यवसाय आहे. तेथून ते पुणे येथे लोखंडी पत्रे व इतर साहित्याचा पुरवठा करतात. दि 15 जुलै रोजी अभिजित पवार हे आंबेगाव परिसरात पुरवठा केलेल्या मालाचे पैसे घेण्यासाठी आले होते. इतर काही ठिकाणांहून गोळा केलेल्या बिलांची तब्बल चाळीस लाख रुपये रोकड असलेली बॅग त्यांनी सोबत आणलेल्या मित्राकडे ठेवली होती. बाबजी पेट्रोल पंपासमोर अचानक थार गाडीतून आलेल्या अज्ञात इसमांनी बॅग हिसकावून पळ काढला. थार गाडीचा नंबर एम एच 12 डब्ल्यु ई 0085 असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत आंबेगाव पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले.
मित्रच निघाला सुत्रधार!
दरम्यान पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून व्यावसायिक अभिजित पवार यांचा मित्र मंगेश ढोणे याणेच आरोपींना टीप दिल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मंगेश ढोणे यालाही अटक करण्यात आली आहे.
गाडीत आढळल्या चार नंबर प्लेट
पोलीसांनी पकडल्यानंतर गाडीची तपासणी केली असता थार गाडीत वेगवेगळ्या प्रकारात एकच नंबर असलेल्या चार नंबरप्लेट आढळून आल्या आहेत. पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी अशा वेगवेगळ्या नंबरप्लेट बनवल्या असाव्या असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे
सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजन कुमार शर्मापोलीस सह आयुक्त, राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, मिलींद मोहिते पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2, राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय कुंभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक – २, पुणे शहर, अंजुम बागवान वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-2 , आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, गुन्हे शाखा युनिट २ चे सहा. पोलीस निरीक्षकअमोल रसाळ, अशिष कवठेकर, आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, सहाय्यक फौजदार शैलेंद्र साठे, पोलीस हवालदार गणेश दुधाने, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, स्मिता पवार,निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, पोलीस अंमलदार आबासो खाडे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे,अजय कामठे, सुभाष मोरे, शिवा पाटोळे, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, राजेश टेकावडे, हरिष गायकवाड तसेच अवधूत जमदाडे पोउआ परि-2 कार्यालय पुणे शहर व गुन्हे शाखा युनिट -2 चे पोलीस अंमलदार ओंकार कुंभार, अमोल सरडे व पवन भोसले यांनी केली आहे.








